दिल्लीत सुमारे ६७ टक्के मतदान

By Admin | Updated: February 7, 2015 18:54 IST2015-02-07T18:16:35+5:302015-02-07T18:54:26+5:30

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी सुमारे ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

About 67 percent voting in Delhi | दिल्लीत सुमारे ६७ टक्के मतदान

दिल्लीत सुमारे ६७ टक्के मतदान

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ७ -  संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी शनिवारी शांततापूर्ण वातावरण मतदान पार पडले. यंदा दिल्लीत सुमारे ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी दोन टक्क्यांनी वाढली आहे.  
किरण बेदींना पुढे करुन दिल्लीचे तख्त काबीज करण्याच्या प्रयत्नात असलेला भाजपा आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी इच्छूक असलेले अरविंद केजरीवाल यांच्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी शनिवारी मतदान झाले. सकाळी ८ वाजता मतदानास सुरूवात झाली. अपेक्षेप्रमाणे दिल्लीकरांनी मतदानाचा चांगला प्रतिसाद देत उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद केले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे ६७ टक्के मतदान झाले होते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला होता. मतदानाची अंतिम आकडेवारी येईपर्यंत  मतदानाचा टक्का आणखी वाढूही शकतो असे निवडणूक अधिका-यांनी सांगितले.  
आप - भाजपामध्ये आरोपप्रत्यारोप 
मतदानाच्या दिवशीही आम आदमी पक्ष आणि भाजपामध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरुच होत्या. किरण बेदी यांनी त्यांच्या कृष्णानगर मतदारसंघात पाच किलोमीटरची पदयात्रा करत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आपने केला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवणा-या भाजपाच्या महिला उमेदवाराने आपच्या कार्यकर्त्यांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. 
 
दिग्गज्जांनी केले मतदान
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, आप प्रमुख अरविंद केजरीवाल, भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींसह  अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला. 
 
आता लक्ष निकालाकडे
भाजपा, काँग्रेस, आम आदमी पक्ष व अन्य पक्षांचे मिळून ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  १२ हजार ७७७ मतदान केंद्रावर मतदान पार पडले आहे. आता सर्वांचे लक्ष १० फेब्रुवारी रोजी होणा-या मतमोजणीकडे लागले आहे. 

 

Web Title: About 67 percent voting in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.