अभिजित कोळपे बातमी : नि:स्वार्थी भावनेने जमवली शंभरपेक्षा अधिक लग्ने

By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:20+5:302015-02-08T00:19:20+5:30

राजूकाका लक्ष्मण देशपांडे यांचा उपक्रम : वधूवर सूचक मंडळांना ग्रामीण भागातही वाढतेय मागणी

Abhijit Kollapa News: More than 100 marriages of earning selflessly | अभिजित कोळपे बातमी : नि:स्वार्थी भावनेने जमवली शंभरपेक्षा अधिक लग्ने

अभिजित कोळपे बातमी : नि:स्वार्थी भावनेने जमवली शंभरपेक्षा अधिक लग्ने

जूकाका लक्ष्मण देशपांडे यांचा उपक्रम : वधूवर सूचक मंडळांना ग्रामीण भागातही वाढतेय मागणी
टाकळीहाजी : लग्न जमवायचे म्हटले, की त्रास घ्यावाच लागतो. यासाठी वधूवर सूचक मंडळाशी संपर्क साधल्यास सोपे जाते. मात्र, शहरात अशी मंडळे आहेत; परंतु ग्रामीण भागात मात्र अद्याप अशी मंडळे नाहीत. त्यामुळे लग्न जमविणे त्रासदायक ठरते; मात्र निघोज (ता. पारनेर) येथील राजूकाका लक्ष्मण देशपांडे यांनी दोन वर्षांपासून वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून शंभरपेक्षा जास्त लग्न जमवून आणली आहेत.
पारनेर तालुक्याबरोबरच शिरूर तालुक्यातील गावांमध्ये हे काम त्यांनी केले आहे. श्रीमंत समाजातील घटकांना लग्न जमविणे सहज शक्य होते; मात्र गरीब घटकांना हे लवकर शक्य होत नाही. राजूकाका हे मात्र गोरगरीब गरजू कुटुंबाकरिता हे काम करीत असल्याने सर्वसमावेशक घटकांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात झाला आहे.
राजूकाका हे विवाहात पौराहित्य करण्याचे काम गेल्या २० वर्षांपासून करीत आहेत. पूजा, वास्तुशांती ही नेहमीचे धार्मिक कामे ते करतातच; मात्र वधूवर सूचक मंडळाचे काम त्यांनी दोन वर्षांपासून सुरू केल्याने परिसरातील निघोज, गुणोरे, गाडीलगाव, वडगाव गुंड, वडनेर, शिरसुले, लोणी, हवेली, जवळा, राळेगण, थेरपाळ, नरवडेवाडी, दरोडी, जातेगाव, वेसदरे, भोंद्रे, वनकुटे या पारनेर तालुक्यातील गावांबरोबरच शिरूर तालुक्यातील मलठण, टाकळीहाजीकडे गोलेगाव, रांजणगाव या गावांतील लग्न जमविण्याचे काम त्यांनी केले आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची फी न घेता; उलट ज्यांची लग्ने जमवली आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा प्रकारे नि:स्वार्थी सेवा करण्याचे काम त्यांनी केले असून या सर्वच गावांतील ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे. ते त्यांना धन्यवाद देत आहेत.
देशपांडे कुटुंब हे या परिसरात पौराहित्य करण्याचे काम गेले ६० वर्षांपासून करीत आहेत. त्यांचे वडील लक्ष्मण देशपांडे यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पोपटकाका देशपांडे यांनी हा वारसा पुढे सुरू ठेवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे धाकटे बंधू राजूकाका यांनी हे काम सुरू ठेवले. पोपटकाका हे पौरोहित्याचे कामे करून प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम करीत आहेत. राजूकाका यांनी मात्र वधू-वर सूचक मंडळाचे काम सुरू करून या भागातील विवाहेच्छुकांच्या पालकांचे काम सोपे करण्याचे काम केले आहे.
(चौकट)
गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडून कौतुक
या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याला चालना मिळावी यासाठी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख ठकारामशेठ लंके यांनी नुकत्याच झालेल्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात राजूकाका देशपांडे यांच्या सत्काराचे नियोजन केले होते. गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते देशपांडे यांचा सत्कार केला. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आमदार विजय औटी, माजी आमदार पोपटराव गावडे यांनीही देशपांडे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
फोटो ओळ : वधूवर सूचक मंडळाचे निघोज व टाकळीहाजी परिसरातील प्रणेते राजूकाका देशपांडे यांचा गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Abhijit Kollapa News: More than 100 marriages of earning selflessly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.