‘आप’च्या निधीत अचानक ७०% वाढ
By Admin | Updated: February 5, 2015 02:40 IST2015-02-05T02:40:48+5:302015-02-05T02:40:48+5:30
आपमधून फुटून निघालेल्या एव्हीएएम या गटाने बेकायदा निधीचा मुद्दा तापविला असला तरी प्रत्यक्षात या आरोपांनंतर आपच्या निधीत लगेच ७० टक्के वाढ झाली

‘आप’च्या निधीत अचानक ७०% वाढ
नवी दिल्ली : आपमधून फुटून निघालेल्या एव्हीएएम या गटाने बेकायदा निधीचा मुद्दा तापविला असला तरी प्रत्यक्षात या आरोपांनंतर आपच्या निधीत लगेच ७० टक्के वाढ झाली असून या पक्षाच्या खात्यात मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत ६२.५ लाख रुपये झाले होते. त्या एकाच दिवशी या पक्षाला ३६.३ लाख रुपयांची देणगी मिळाल्याचा उल्लेख वेबसाईटवर दिसून येतो.
गेल्या १९ दिवसांत आपच्या निधीत घसघशीत वाढ झाली आहे. १२ डिसेंबर २०१३ पासून आपच्या वेबसाईटवर देणग्यांचा डाटा उपलब्ध असून ४१९ दिवसांत झालेली ही १२ वी सर्वोच्च वाढ आहे. १५ जानेवारी रोजी ९० लाख रुपये जमा झाल्यानंतर सर्वात मोठी रक्कम मंगळवारी जमा झाली. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून आपच्या निधीच्या मुद्यावरून राजकीय रणकंदन सुरू आहे.
२०१४ ची लोकसभा निवडणूक आणि त्याआधी २०१३ मधील दिल्ली विधानसभेची निवडणूक पाहता देणग्यांमध्ये होत असलेला चढ-उतार लक्षवेधी ठरतो. लोकप्रियतेला देणग्यांचाच आधार मानला तर सध्या आपची लोकप्रियता शिखरावर आहे.
कोटीच्या कोटी देणग्या...
१ जानेवारी १५ ते ३ फेब्रुवारी १५ या काळात आपला ११.४ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून डिसेंबर १४ च्या तुलनेत ४०० टक्के वाढ झाली आहे. १ मार्च १४ ते ७ एप्रिल १४ या काळात या पक्षाला १३.३ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.
आपच्या निधीबाबत उच्च न्यायालयात याचिका
च्नवी दिल्ली : आम आदमी पार्टीला एफसीआरए तरतुदींचे उल्लंघन करून पैसा मिळत असून या पक्षाला भूतकाळात आणि सध्या मिळत असलेल्या निधीचा सीबीआयमार्फत तपास केला जावा अशी विनंती करणारी याचिका एका वकिलाने बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली.