पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार गुरप्रीत गोगी यांचा राहत्या घरी गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोगी यांना ही गोळी नेमकी कशी लागली, याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. गुरप्रीत गोही हे गोळी लागून गंभीर जखमी झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना लुधियानामधील दयानंद मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल केले. मात्र शुक्रवारी रात्री १२च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आम आदमी पक्षाचे लुधियानामधील जिल्हाध्यक्ष शरणपाल सिंह मक्कर यांनी गोगी यांचा मृत्यू गोळी लागून झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. तसेच पोलीस आयुक्त कुलदीप सिंह चहल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गोगी यांना गोळी लागल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही रुग्णालयात पोहोचलो. आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर गोगी यांनी आत्महत्या केली की, चुकून गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट होईल. प्रथमदर्शनी मिळत असलेल्या माहितीमधून रिवॉल्व्हर साफ करत असताना ट्रिगर दाबला गेल्याने सुटलेली गोळी गोगी यांना लागली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुरप्रीत गोगी यांनी २०२२ मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. तसेच त्यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत लुधियाना पश्चिम येथून दोन वेळा आमदार राहिलेल्या भारत भूषण आशू यांचा पराभव केला होता. गोगी यांची पत्नी सुखचैन कौर या सुद्धा राजकारणात सक्रिय असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत त्या लढल्या होत्या. मात्र त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, आता या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपासाला सुरुवात झाली आहे. तसेच गोगी यांच्या मृत्यूमागचं कारण शोधलं जात आहे.