AIB च्या शोवर आमीर खानही नाराज
By Admin | Updated: February 11, 2015 11:34 IST2015-02-11T11:34:19+5:302015-02-11T11:34:19+5:30
अश्लील शेरेजाबी व अर्वाच्य भाषेमुळे वादग्रस्त ठरलेल्या एआयबी शोवर बॉलीवूडमधील मि. परफेक्शनिस्ट आमीर खानही नाराज आहे.

AIB च्या शोवर आमीर खानही नाराज
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - अश्लील शेरेजाबी व अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ यामुळे वादग्रस्त ठरलेल्या एआयबी शोवर बॉलीवूडमधील मि. परफेक्शनिस्ट आमीर खानही नाराज आहे. एआयबी शो हा अतिशय अश्लाघ्य आणि आक्षेपार्ह असून या शोमध्ये शाब्दीक हिंसा होती अशा शब्दांत आमीरने एआयबीवर टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर अपलोड झालेला एआयबीचा शो हा वादग्रस्त शो ठरला होता. या शोमध्ये करण जोहर, अभिनेता रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर हे सहभागी होते. तर दिपीका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट या अभिनेत्रीही हा शो बघण्यासाठी उपस्थित होत्या. या शोमध्ये करण जोहर, रणवीर व अर्जून या तिघांनी अत्यंत अश्लील भाषेत एकमेकांवर विनोद केले. या शोवर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यावर एआयबीने यूट्युबवरुन व्हिडीओ हटवला आहे. शोविरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल झाली आहे. या शोवर टीका करणा-यांमध्ये आता आमीर खानचाही समावेश झाला आहे.
एका कार्यक्रमात आमीर खानने एआयबीवर त्याची भूमिका मांडली. आमीर म्हणतो, मी हा शो पूर्ण बघितला नाही. पण त्याच्या क्लिपींग मी बघितल्या असून त्या बघून मला अक्षरशः धक्काच बसला. प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्यांचा अधिकार आहे यात काहीच गैर नाही. पण या शोमधून तुम्ही किती हिंसक आहात हेच दिसते. एखाद्याला बोलवून त्याला शिवीगाळ करुन त्याचा अपमान करणे चुकीचे आहे. या शोमध्ये शाब्दीक हिंसा असल्याचे मला वाटते असे मत आमीरने व्यक्त केले.
एआयबीचा शो बघून मी करण जोहर व अर्जूनला झापलंच असे आमीरने आवर्जून सांगितले. एखाद्याला २५ शिव्या घालून तुम्ही इतरांना इम्प्रेस कराल तर हे मला पटत नाही. १४ वर्षाच्या मुलालाच हे पटू शकते. एखाद्याला न दुखवता त्यांना हसवणं हीच खरी कला आहे असा सणसणीत टोलाही आमीरने लगावला. कलाकार म्हणून काम करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवायला हवे असा सल्लाही त्याने दिला.