‘आप’मधील यादवी तीव्र!
By Admin | Updated: March 12, 2015 01:58 IST2015-03-12T01:58:47+5:302015-03-12T01:58:47+5:30
आम आदमी पार्टीत (आप)आलेल्या भूकंपाचे हादरे अजूनही थांबले नसून पक्षावरील राजकीय संकट अधिक वाढले आहे.मुंबईत पक्षाचा चे

‘आप’मधील यादवी तीव्र!
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीत (आप)आलेल्या भूकंपाचे हादरे अजूनही थांबले नसून पक्षावरील राजकीय संकट अधिक वाढले आहे.मुंबईत पक्षाचा चेहरा राहिलेल्या अंजली दमानिया यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गेल्या वर्षी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचे सहा आमदार खरेदीचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत बुधवारी आपला सोडचिठ्ठी दिल्याने या पक्षाला मोठा हादरा बसला आहे. दुसरीकडे एका आमदाराने शांती भूषण आणि प्रशांत भूषण यांच्यासह योगेंद्र यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी हस्ताक्षर मोहीम सुरू केली आहे.
आपण अरविंद केजरीवाल यांना सिद्धांतांसाठी पाठिंबा दिला होता घोडेबाजारासाठी नाही, अशी तोफ दमानिया यांनी पक्ष सोडताना डागली आहे. केजरीवाल यांनी गेल्या वर्षी दिल्लीत सरकार स्थापनेसाठी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची गोष्ट केली होती, असा आरोप या पक्षाचे रोहिणी येथील माजी आमदार राजेश गर्ग यांनी केला आहे. आपल्या या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी केजरीवाल यांनी यासंदर्भात केलेल्या संभाषणाची आॅडिओ क्लिपही जारी केली आहे. दमानिया यांनी याच क्लिपचा हवाला देऊन राजीनामा दिला.
राजेश गर्ग यांच्या म्हणण्यानुसार विद्यमान उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया काँग्रेस आमदारांच्या संपर्कात होते आणि त्यांना एक नवा राजकीय पक्ष स्थापन करून आपला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी चिथावत होते. कारण केजरीवाल यांना पुन्हा विधानसभा निवडणुका नको होत्या. त्यांनी पुराव्यादाखल जारी केलेल्या आॅडिओ क्लिपमध्ये केजरीवाल हे ‘आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार आहोत. परंतु काँग्रेस आम्हाला पाठिंबा देण्यास तयार नाही. मनीष सिसोदिया काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमध्ये फूट पाडा. सहा आमदारांना नवा पक्ष स्थापन करून आपल्याला पाठिंबा देण्यास सांगा’असे स्पष्ट सांगत आहेत. पक्षांतरविरोधी कायद्यापासून बचावाकरिता पक्षातून बाहेर पडणाऱ्या गटात किमान सहा आमदार असणे आवश्यक होते.