मयंक गांधी : यादव, भूषण यांच्या हकालपट्टीवर नाराजी; निर्णयामागील हेतूवर प्रश्नचिन्हनवी दिल्ली : आम आदमी पार्टीत धूळवड सुरूच असून प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव या दोन नेत्यांना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) हटविण्याच्या निर्णयावर आपचे वरिष्ठ नेते मयंक गांधी यांनी गुरुवारी तीव्र नाजारी व्यक्त केली. उभय नेत्यांना हटविण्याची पद्धत आणि त्यामागील हेतूवरही त्यांनी हल्लाबोल केला आहे.राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बुधवारी झालेल्या मतदानाच्या वेळी मयंक गांधी अनुपस्थित होते. यादव आणि भूषण या दोघांनीही स्वेच्छेने समितीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शविल्यानंतरही मनीष सिसोदिया यांनी उभयतांना हटविण्याचा प्रस्ताव मांडण्याच्या प्रकाराने आपण स्तब्ध झालो आहोत, अशा शब्दात त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे. आपल्या ब्लॉगवर यासंदर्भात मत मांडतानागांधी यांनी भूषण आणि यादव पीएसीचे सदस्य राहिल्यास आपण आपचे राष्ट्रीय संयोजक म्हणून काम करू शकणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते, असा दावा केला आहे. यादव हे केजरीवाल यांच्याविरुद्ध कटकारस्थान रचत होते असा ठपका ठेवण्यात आला असून बैठकीदरम्यान यासंदर्भात काही साक्षीही देण्यात आल्या. काम करण्यात अडचणी येत असल्याने केजरीवाल आपल्यास पीएसीमध्ये ठेवू इच्छीत नाहीत. तेव्हा मी व प्रशांत समितीतून बाहेर पडू परंतु आम्हाला काढण्यात येऊ नये, असे योगेंद्र यादव यांनी सांगितले होते. त्यांनी दोन फॉर्म्युलेही दिले होते. पीएसीची पुनर्स्थापना करण्यात यावी आणि मतदानाद्वारे नवीन सदस्यांची निवड व्हावी. भूषण आणि यादव यात उमेदवार राहणार नाहीत. समितीच्या कामकाजाची विद्यमान पद्धतच कायम राहील आणि उभय नेते कुठल्याही बैठकीला हजर राहणार नाहीत, असे सुचविण्यात आले होते, याकडे गांधी यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, बैठकीच्या मध्यान्हानंतर मनीष सिसोदिया आणि इतरांनी आशिष खेतान, आशुतोष, दिलीप पांडे आदींसोबत विचारविनिमय केला आणि त्यानंतर बैठक पुन्हा सुरू होताच सिसोदिया यांनी यादव व प्रशांत यांना समितीतून बाहेर काढण्याचा प्रस्ताव मांडला. संजयसिंग यांनी त्याला अनुमोदन दिले. सिसोदिया यांच्या प्रस्तावाने आपण स्तब्ध झालो आहोत. या दोघांना हटविण्यात आल्याने आपण चकित झालो असून हा निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारा आहे, अशी खंत गांधी यांनी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)पक्षाच्या कामकाजात तोडगा निघू शकणार नाहीत असे काही मतभेद आहेत. तसेच एके (केजरीवाल), पीबी (भूषण) आणि वायवाय (यादव) यांच्यात परस्पर विश्वासाची कमतरता आहे, असे आपचे नेते मयंक गांधी यांनी म्हटले आहे.दरम्यान सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना यादव यांनी गांधींच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आपण तो वाचला असल्याचे मात्र त्यांनी सांगितले. पक्ष सोडण्याची शक्यताही त्यांनी फेटाळली असून समर्थकांना आपल्यावर विश्वास असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
‘आम आदमी पार्टी’ची धूळवड थांबेना
By admin | Updated: March 5, 2015 23:52 IST