Yamuna Video: नदीलापूर आला की, उडी मारून तिरावर यायचं. पावसाळ्यात अशी दृश्ये ठिकठिकाणी बघायला मिळतात. पण, त्यात अनेकांनी जीव गमावले आहेत. अशीच एक घटना दिल्लीत घडली आहे. पुलावरून नदीचापूर बघत असताना तरुणांमध्ये ५०० रुपयांची पैज लागली. तरुणाने जोशात उडी मारली, पण खवळलेल्या यमुनेने त्याला काठापर्यंत येऊच दिलं नाही. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यामध्ये. यमुनेचा पूर पाहण्यासाठी पुलावर तरुणांची गर्दी जमलेली असतानाच हा प्रकार घडला. तरुण नदीत उडी मारताना आणि वाहून जाईपर्यंत सगळं कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. जुनैद असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे.
नक्की काय घडलं?
जुनैद त्याच्या मित्रांसह यमुना नदीचा पूर बघायला गेला होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये नदीमध्ये उडी मारायची आणि पोहत काठावर यायचं अशी पैज लागली. काठावर पोहोचला तर ५०० रुपये, अशी पैज लागली.
जुनैदने पूर आलेल्या यमुना नदीच्या पात्रामध्ये उडी मारली. त्यानंतर तो काठावर येण्यासाठी हातपाय मारून लागला, पण पाण्याचा वेग आणि भोवरे यामुळे त्याला जमलंच नाही. पाणी त्याला पुढे ढकलत घेऊन जाऊ लागले. बराच दूर जाईपर्यंत जुनैद पोहत राहिला, पण त्याला काही बाहेर पडता आलं नाही. त्यानंतर तो पाण्यात दिसेनासा झाला.
एनडीआरएफकडून शोध सुरू
जुनैद वाहून गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. एनडीआरएफ पथकाकडून नदीपात्रात आणि समोरच्या भागात शोध सुरू आहे. नवादा चेक पोस्टजवळ ही घटना घडली.