छत्तीसगडमधीन नवं रायपूर येथे स्पोर्ट्स बाईकला झालेल्या भीषण अपघातात भाजपाचे नेते आणि छत्तीसगड सरकारमधील वनमंत्री केदाश कश्यप यांचा पुतण्या आणि माजी खासदार दिनेश कश्यम यांचा मुलगा निखिल कश्यप मृत्यू झाला. निखिल हा त्याच्याकडील स्पोर्ट्स बाईकवरून कुठेतरी जात होता. त्यावेळी त्याची भरधाव दुचाकी ही नियंत्रण सुटून रस्त्यावरील दुभाजकावर आदळली. या अपघातात निखिलच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तसेच त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हा अपघात नवं रायपूर येथील मंदिर हसौद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. आज सकाळी ७.३० च्या सुमारास निखिल कश्यप हा सत्य साई रुग्णालयाच्या दिशेने जात होता. त्याच्या दुचाकीवर त्याचा मित्रही होता. मिळालेल्या माहितीनुसार ही दुचाकी स्वत: निखिल चालवत होता. तसेच सुसाट चाललेली ही दुचाकी नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळली. या अपघातात निखिलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला आहे. तसेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघाताची माहिती मिळताच वनमंत्री केदार कश्यप आणि रायपूरचे एसएसपी लाल उमेद सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघात स्थळाची पाहणी करून मृतदेह पोस्टमार्टेम करण्यासाठी पाठवण्यात आला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निखिल कश्यप याचे वडील दिनेश कश्यप माजी खासदार आहेत. ते बस्तर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तर त्याची आई वेदवती कश्यप ह्या बस्तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. दरम्यान, निखिल कश्यपच्या अपघाती मृत्युबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय याने शोक व्यक्त केला आहे.