उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील लोकबंधू रुग्णालयामध्ये मध्यरात्रीनंतर भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या महिला वॉर्ड आणि आयसीयूमध्ये ही आग लागली. आगीमुळे संपूर्ण फ्लोअरवर धुराचं साम्राज्य पसरलं. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली चपळता आणि रुग्णालयातील अधिकारी आणि व्यवस्थापनाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे २०० रुग्णांना सुखरूप बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात यश आले. दरम्यान, आता रुग्णालयाला लागलेल्या आगीदरम्यानचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.
लखनौ फायर ब्रिगेडचे सीएफओ मंगेश कुमार यांनी सांगितले की, आम्हाला रात्री ९.४४ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आगीच्या दहशतीमुळे अनेक लोक पळत होतो. तसेच काही रुग्णालयाच्या खिडकीवरून मदतीसाठी याचना करत होते. तसेच खाली उडी मागण्याचा प्रयत्न करत होते. त्याशिवाय काही जणांनी पायऱ्यांवरूनही पळण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळावर परिस्थिती गंभीर असल्याचे आणि लोक खिडक्यांमधून उड्या मारण्याचा प्रयत्न करत असल्याने जीवितहानीही होऊ शकते, असे चित्र आमच्या पथकाने पाहिले. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाचे जवान अनेक भागात विभागले गेले. त्यानंतर काही जवान अनेक भागात विभागले गेले. त्यानंतर काही जणांना पायऱ्यांवरून उतरवण्यात आले. तर काही जणांना दोरीच्या मदतीने बाहेर काढले. दरम्यान, पथकातील इतर सहकारी जवानांनी आग शमवण्याचं काम केलं. तसेच केवळ ३० मिनिटांत आग शमवली.
आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडच्या पथकाने पोलीस कर्मचारी आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांना आगीच्या तावडीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. दरम्यान, काही रुग्णांना व्हेंटिलेटरच्या माध्यमातूनही रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. तसेच अॅम्ब्युलन्समधून त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.