नवी दिल्ली - संसदेत सध्या ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा सुरू आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप चालले आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. मी गर्वाने सांगतो, कुठलाही हिंदू कधी दहशतवादी होऊ शकत नाही असं विधान अमित शाह यांनी सभागृहात केले. विशेष म्हणजे मालेगाव स्फोटाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शाह यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
२६/११ मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत अमित शाह म्हणाले की, काही लोक लष्कर ए तय्यबाच्या या दहशतवादी हल्ल्याबाबत हिंदुत्ववादी संघटनांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा यात समावेश आहे. काँग्रेसने मतांसाठी दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला परंतु भारतातील जनतेने त्यांचे खोटे स्वीकारले नाही. काँग्रेसने कायम तुष्टीकरणाचं राजकारण केले. या देशात दहशतवाद पसरण्याचं एकमेव कारण म्हणजे काँग्रेसची व्होट बँक पोलिटिक्स आहे. त्यामुळे भारताची अंतर्गत सुरक्षा कमकुवत केली असा घणाघात त्यांनी केला.
तसेच जम्मू काश्मीरात आज दहशतवाद कमी प्रमाणात आहे. एक काळ होता जेव्हा पाकिस्तानला इथं दहशतवादी पाठवण्याची गरज नव्हती, आपलेच युवा कट्टरपंथी बनत होते. परंतु मागील ६ महिन्यात एकाही काश्मिरी युवकाने हातात बंदूक उचलली नाही. आता जे मारले जात आहेत ते पाकिस्तानी आहेत. स्थानिक युवक दहशतवादी संघटनांमध्ये जात नाहीत. जम्मू काश्मीर इथली निवडणूकही निष्पक्षपणे पार पडली. निष्पक्षता असल्याने तिथल्या वातावरणात मोठा बदल झाला. पहलगाम हल्ल्यानंतर एकही गाव असे नव्हते जिथे या हत्यांविरोधात मोर्चा निघाला नाही असंही अमित शाह यांनी म्हटलं.
मालेगाव स्फोटाचा आज निकाल
दरम्यान, अमित शाह यांचे विधान मालेगाव स्फोटाच्या निकालाच्या काही तास आधी आले आहे. या स्फोटाचा आरोप अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेवर आहे. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे सात जण यातील आरोपी आहेत. या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल सुमारे १७ वर्षांनी विशेष एनआयए न्यायालय आज देणार आहे.