सावत्र आईने माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य करत आपल्या सावत्र मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. बिहारमधील बक्सर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका सावत्र आईने तिच्या आठ वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा आवळन खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून त्याचे अवशेष गोणीत लपवून ठेवले. मात्र पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपी महिलेला अटक केली.
बक्सरचे पोलीस अधीक्षक शुभम आर्य यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, पीडित मुलीची ओळख आंचल कुमारी अशी पटली आहे. शनिवारी रात्री डुमरांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नया भोजपूर परिसरातील एका घरात लाकडाच्या खोक्यामध्ये लपवलेल्या गोणीमध्ये तिच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी शनिवारी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध घेण्यासाठी तातडीने शोधमोहीम सुरू केली होती.
याबाबत अधिक माहिती देताना एसपींनी सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये मृत मुलीच्या सावत्र आईने गुन्हा कबूल केला आहे. मी माझ्या सावत्र मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाला आग लावली. तसेच मृतदेहाचे अवशेष गोणीमध्ये भरून लाकडी खोक्यामध्ये लपवले, असे तिने सांगितले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी महिलेने दिलेला कबुलीजबाब आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी या आरोपी सावत्र आईला अटक केली आहे. तिच्याविरोधात भादंविमधील विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.