कर महसुलामध्ये झाली 95% वाढ; प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रमुख मोहपात्रा यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 15:58 IST2021-08-12T15:58:40+5:302021-08-12T15:58:48+5:30
मोहपात्रा यांनी सांगितले की, परतावे वजा केल्यानंतर उरणारे प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन यंदा ३.४० लाख कोटी रुपयांवर गेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ते ९५ टक्क्यांनी अधिक आहे.

कर महसुलामध्ये झाली 95% वाढ; प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रमुख मोहपात्रा यांची माहिती
नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचे प्रत्यक्ष करांचे संकलन तब्बल ९५ टक्क्यांनी वाढून ३.४० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) चेअरमन जे. बी. मोहपात्रा यांनी ही माहिती दिली.
मोहपात्रा यांनी सांगितले की, परतावे वजा केल्यानंतर उरणारे प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन यंदा ३.४० लाख कोटी रुपयांवर गेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ते ९५ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण प्रत्यक्ष कर संकलन आदल्या वर्षाच्या तुलनेत ५१ टक्क्यांपेक्षा अधिक राहिले. कर संकलनाचे उद्दिष्ट यंदा आम्ही गाठू शकू, याबाबत आम्ही आता आशावादी झालो आहोत.
सीबीडीटी प्रमुखांनी सांगितले की, वित्त वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीत प्रतिभूती व्यवहार करातून (एसटीटी) विक्रमी ५,३७३ कोटी रुपये मिळाले. वित्त वर्ष २०२० च्या तुलनेत या कराच्या संकलनात १०९ टक्के वाढ झाली आहे.
शेअर बाजारात सूचीबद्ध अथवा बिगर सूचीबद्ध समभागांच्या खरेदी-विक्री व्यवहारावर जो कर लावला जातो, त्यास एसटीटी म्हटले जाते. डेरिव्हेटिव्हज, समभागाशी जोडलेले म्युच्युअल फंड, कर्जरोखे आणि रोखे यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरही हा कर लावला जातो.
४५ हजार कोटींहून अधिक परतावे
मोहपात्रा यांनी सांगितले की, १ एप्रिल २०२१ ते २ ऑगस्ट २०२१ या दरम्यान सीबीडीटीने २१.३२ लाख करदात्यांना ४५,८९६ कोटी रुपयांचे कर परतावे दिले आहेत. २०,१२,८०२ प्रकरणांत १३,६९४ कोटींचे प्राप्तिकर परतावे, तर १,१९,१७३ प्रकरणांत ३२,२०३ कोटींचे कंपनी कराचे परतावे आहेत.