घर खरेदीसाठी लवकरच काढता येणार 90 टक्के पीएफ
By Admin | Updated: March 15, 2017 18:39 IST2017-03-15T18:39:08+5:302017-03-15T18:39:21+5:30
केंद्र सरकार 4 कोटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना घर खरेदीसाठी 90 टक्के भविष्य निर्वाह निधी काढण्याची सवलत देण्याच्या विचारात आहे.

घर खरेदीसाठी लवकरच काढता येणार 90 टक्के पीएफ
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - केंद्र सरकार 4 कोटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना घर खरेदीसाठी 90 टक्के भविष्य निर्वाह निधी काढण्याची सवलत देण्याच्या विचारात आहे. केंद्र सरकारनं आज याची संसदेत माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या या तरतुदीमुळे ईपीएफ सदस्यांना घर खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट भरण्यास मदत मिळणार आहे. या योजनेत दुरुस्ती केल्यानंतर नोकरदात्यांना स्वतःच्या ईपीएफ अकाऊंटवरून होम लोन आणि ईएमआयही भरता येणार आहे.
ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार 10 ईपीएफओ सदस्यांना एकत्र येऊन एका को ऑ. सोसायटीची स्थापना करावी लागणार आहे. त्यानंतरच ही रक्कम त्यांना काढता येणार आहे. नोकरदारांच्या घरांसंबंधी प्रश्नाला उत्तर देताना बंडारू दत्तात्रय संसदेत म्हणाले, सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी 1952च्या कायद्यात संशोधन सुरू आहे. या योजनेत परिच्छेद 68 डी जोडण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार सदस्य कोणत्याही को. ऑ. सोसायटी किंवा हाऊसिंग सोसायटीचा सदस्य असल्यास त्याला घर अथवा प्लॅट खरेदी करण्यासाठी स्वतःच्या खात्यामधून 90 टक्के रक्कम काढता येणार आहे. तसेत दुकान बनवण्यासाठीही तुम्हाला ही रक्कम वापरता येणार आहे, असंही दत्तात्रय म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी पीएफ खातेधारकांना अशी सुविधा देण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले होते. बहुतेक कर्मचारी स्वतःचं आयुष्य भाड्याच्या दुकानात घालवतात. सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम ते घर खरेदी करण्यासाठी वापरतात. सध्या तरी ईपीएफओच्या अंतर्गत येणा-या सर्व कर्मचा-यांना स्वतःच्या पगाराची 12 टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीसाठी द्यावी लागते. त्यात मूळ वेतन आणि महागाईभत्त्याचाही समावेश असतो.