काश्मीरसाठी ८० हजार कोटी
By Admin | Updated: November 8, 2015 03:23 IST2015-11-08T03:23:25+5:302015-11-08T03:23:25+5:30
जम्मू-काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ८० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा विशेष

काश्मीरसाठी ८० हजार कोटी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ८० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा विशेष नामोल्लेख, अफाट गर्दी आणि कडेकोट सुरक्षा असे अनेक पैलू मोदींच्या या दौऱ्याला लाभले होते. भाजपा-पीडीपी सत्तारूढ झाल्यानंतरच्या मोदींच्या या पहिल्याच श्रीनगर दौऱ्यासाठी या भागातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
बिहारला अलीकडेच एक लाख २५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करणाऱ्या पंतप्रधानांनी काश्मीरच्या विकासासाठी ८० हजार कोटी ही मर्यादा नसून, गरज पडल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही दिली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विकासमंत्राचे स्मरण करताना ते म्हणाले, की काश्मीरबाबत मला या जगात कुणाचा सल्ला अथवा विश्लेषणाची गरज नाही. अटलजींचे तीन मंत्रच त्याच्या विकासासाठी पुरेसे आहेत. काश्मीर म्हणजे भारताची शान असून, त्याच्याशिवाय हा देश अपूर्ण आहे.
मोदींच्या सभेसाठी जमलेल्या गर्दीत सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीचे कार्यकर्ते, विविध राज्यांमधील मजूर आणि जम्मू-काश्मीर सरकारचे अस्थायी कर्मचारीसुद्धा सहभागी झाले होते. बिहार, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील कामगारांची संख्या यावेळी भरपूर होती. (वृत्तसंस्था)
जम्मू-काश्मिरात १९४७ मध्ये आलेल्या पश्चिम पाकिस्तानातील शरणार्र्थींचे पुनर्वसन आणि निर्वासित काश्मिरी पंडितांची सन्मानाने वापसी व पुनर्वसन ही सरकारची सर्वात महत्त्वाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी जम्मूच्या चंदरकोट येथे केले. बगलिहार वीज प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाची स्थापित क्षमता ४५० मेगावॅटची आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना का नाही?
काश्मिरात मागील ३० वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना पंतप्रधान मोदी यांनी क्रिकेटपटू परवेज रसूलचे कौतुक केले.