७० टक्के अंध असलेले सुरेंद्र मोहन होणार न्यायाधीश
By Admin | Updated: July 19, 2015 23:25 IST2015-07-19T23:25:22+5:302015-07-19T23:25:22+5:30
७० टक्के अंध असलेले सीबीआयचे प्रॉसिक्युटर व्ही. सुरेंद्र मोहन यांचा न्यायाधीश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवड प्रक्रियेत त्यांच्यासाठी एक जागा राखून ठेवा

७० टक्के अंध असलेले सुरेंद्र मोहन होणार न्यायाधीश
चेन्नई : ७० टक्के अंध असलेले सीबीआयचे प्रॉसिक्युटर व्ही. सुरेंद्र मोहन यांचा न्यायाधीश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवड प्रक्रियेत त्यांच्यासाठी एक जागा राखून ठेवा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिला आहे.
गत १० जुलैला न्या. व्ही. गौडा आणि न्या. एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठाने याबाबतचा अंतरिम आदेश दिला होता. चेन्नईच्या थिरुवोत्रियूरचे सुरेंद्र मोहन यांनी लेखी परीक्षा दिली होती. मात्र त्यांचे नाव मुलाखतीसाठी निवड झालेल्यांच्या यादीत नव्हते. आपले नाव या यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी त्यांनी एक याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांना मुलाखतीत भाग घेण्याची परवानगी देत, त्यांचा निकाल सील ठेवला होता. एका आदेशानंतर त्यांचा निकाल उघड करण्यात आला. त्यानुसार, सुरेंद्र यांनी लेखी परीक्षेत ४०० पैकी १७८ गुण मिळवले होते तर मुलाखतीत ६० पैकी ३८.२५ टक्के गुण संपादन केले होते.यानंतर दिवाणी न्यायाधीशपदावरील नियुक्तीसाठी सुरेंद्र पात्र आहेत का, अशी विचारणा न्यायालयाने तामिळनाडू सरकारकडे केली होती. यावेळी ते या पदावरील नियुक्तीसाठी योग्य असल्याचे तामिळनाडू राज्य सेवा आयोगाकडून सांगण्यात आले होते. मुलाखतीदरम्यान ते अगदी सहज होते. मात्र ५० टक्क्यांपेक्षा अधिक अंधत्व असल्याने त्यांची निवड करण्यात आली नव्हती, असे आयोगाने सांगितले होते. (वृत्तसंस्था)
नियमानुसार, ४० ते ५० टक्क्यांदरम्यान अंधत्व मान्य आहे. मात्र त्यापेक्षा अधिक अंधत्व असल्यास त्यास अपात्र ठरवले जाते. मात्र याउपरही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि जबर इच्छाशक्ती या जोरावर सुरेंद्र मोहन दिवाणी न्यायाधीशपदापर्यंत पोहोचले.