एनटीसी जमीन घोटाळ्यात वाघेलांसह ७ जणांवर गुन्हा
By Admin | Updated: June 18, 2015 01:29 IST2015-06-18T01:29:48+5:302015-06-18T01:29:48+5:30
राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) मुंबईतील परळ येथील मधुसूदन गिरणीची मोक्याच्या ठिकाणची जमीन कोलकात्यातील खासगी कंपनीला

एनटीसी जमीन घोटाळ्यात वाघेलांसह ७ जणांवर गुन्हा
नवी दिल्ली: राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) मुंबईतील परळ येथील मधुसूदन गिरणीची मोक्याच्या ठिकाणची जमीन कोलकात्यातील खासगी कंपनीला कवडीमोल दराने विकल्याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बुधवारी माजी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्यासह सात जणांविरुद्ध औपचारिक गुन्हा नोंदविला. या सर्वांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट करून सरकारचे नुकसान केले,असा आरोप आहे.
या जमीन विक्री व्यवहारात सरकारचे ७०६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. वाघेलांखेरीज ज्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे त्यांत ‘एनटीसी’चे तत्कालिन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रामचंद्रन पिल्लई, तांत्रिक संचालक आर.के. शर्मा व वरिष्ठ व्यवस्थापक (कायदा) एम. के. खरे, कोलकात्याची मे. हॉल अॅण्ड अँडरसन ही कंपनी आणि त्यांचे संचालक कमलेश मेहता यांचा समावेश आहे. सूत्रांनुसार दिल्लीत पिल्लई यांच्या घरात १.५ कोटी रुपयांच्या बँकेतील मुदत ठेवीची पावती जप्त करण्यात आली तर त्यांचा बँक लकरही सील करण्यात आला. शर्मा यांचे दोन लॉकर सील करून त्यांची क्रेडिट कार्डे ताब्यात घेण्यात आली. खरे यांच्या घरी ४५ लाख रुपयांच्या मुदत ठेवी मिळाल्या व त्यांचा लॉकरही सील केला . वाघेला यांच्या निवासस्थानी १३.३३ लाख रुपयांची रोकड मिळाली. ‘एनटीसी’ची कार्यालये, हॉल आणि अँडरसन कंपनीचे कोलकत्यातील कार्यालय आणि लोटस एन्टरप्रायजेस येथेही शोधासाठी छापे घालण्यात आले.
काय झाला व्यवहार?
या गिरणीच्या एकूण ८०,७८५ चौ. मीटर जमिनीपैकी २७,५०० मीटर जमीन मेहता यांच्या हॉल अँड अँडरसन कंपनीस बाजारभावापेक्षा ७०२ कोटी रुपये कमी म्हणजे २९.३५ कोटी रुपयांना विकण्यात आली. या गिरणीची आणखी ४,०८० चौ. मीटर जमीन न्यू जॅक प्रिंटिंग प्रेस प्रा. लि. या कंपनीस बाजारभावापेक्षा कितीतरी कमी भावाने विकली गेली होती व त्यासंदर्भातही ‘सीबीआय’ने पिल्लई व इतरांविरुद्ध स्वतंत्र प्रकरण नोंदविले असून त्याचाही तपास सुरु आहे. पिल्लई यांनी ही जमीन न्यू जॅक कंपनीस भाडेपट्ट्याची रक्कम ९० कोटी रुपयांनी दोन कोटी रुपये एवढी कमी करून भाड्याने दिली. भाडे थकविले तरी नंतर त्यांनाच ती जमीन १७ कोटी रुपयांना विकली गेली, असा आरोप आहे.