महिला बचत गटाचे ६६ हजार हडपले !
By Admin | Updated: May 16, 2014 00:18 IST2014-05-15T21:38:09+5:302014-05-16T00:18:50+5:30
शिवसेना वसाहतमधील एका महिला बचत गटाची मंजूर झालेल्या कर्जाची सुमारे ६६ हजार रुपयांची रक्कम हडपल्याचा प्रकार समोर आला आहे.

महिला बचत गटाचे ६६ हजार हडपले !
अकोला - जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील एका महिला बचत गटाची मंजूर झालेल्या कर्जाची सुमारे ६६ हजार रुपयांची रक्कम हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. एस.के. मायक्रो फायनान्स शाखाध्यक्षाने हा प्रताप केला असून, त्याच्याविरुद्ध जुने शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना वसाहतमधील म्हसोबा लाईनमध्ये रहिवासी असलेली सविता भिकाजी वारकर यांनी परिसरातील सहा महिलांना सोबत घेऊन बचत गटाची निर्मिती केली. त्यानंतर बचत गटाच्या सहाही महिलांनी हैदराबाद येथील एस. के. मायक्रो फायनान्सच्या डाबकी रोड शाखेत कर्ज मिळण्याकरिता अर्ज सादर केला. एस के. मायक्रो फायनान्सचे शाखा अध्यक्ष जितेंद्र मधुकर उतखडे यांनी दस्तऐवजाची पाहणी केली. तसेच बचत गटाच्या सहाही महिलांची कोर्या कागदावर स्वाक्षरी घेतली; मात्र कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नाही. दोन ते तीन दिवसांमध्ये ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार असल्याचेही जितेंद्र उतखडे यांनी बचत गटाच्या महिलांना सांगितले. कर्ज मिळाले की नाही, याबाबत वरिष्ठ स्तरावरून फोनवर विचारणा झाल्यास कर्ज मिळाल्याचे सांगावे, असेही उतखडे यांनी महिलांना सांगून ठेवले होते. वरिष्ठ स्तरावरून विचारणा होताच, या महिलांनी कर्जाची रक्कम मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर महिलांनी कर्जाची रक्कम मागण्यासाठी एस के. मायक्रो फायनान्सच्या ऑफीसमध्ये वारंवार चकरा मारल्यानंतरही त्यांना कर्ज मिळाले नाही. यावरून त्यांना कर्ज नामंजूर झाल्याची माहिती मिळाली. मात्र, काही दिवसातच सहाही महिलांना कर्जाची मासिक रक्कम भरण्यात येत नसल्याची नोटीस आली. त्यानंतर महिलांनी फायनान्सच्या कार्यालयामध्ये जाऊन विचारणा केली असता त्यांनी ६६ हजार रुपये कर्जाची उचल केल्याचे समोर आले. मात्र, त्यांच्या कर्जाची रक्कम शाखा अध्यक्ष जितेंद्र उतखडे यांनीच हडप केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणामध्ये उतखडे यांनी सहाही महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी सविता वारकर यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एस. के. मायक्रो फायनान्सचा शाखा अध्यक्ष जितेंद्र उतखडे याच्याविरुद्ध कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला.