उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धाराली आणि हर्षिल गावात निसर्गाने केलेल्या कहरानंतर, लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी दोन्ही ठिकाणी युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. आपत्तीग्रस्त धराली आणि हर्षिलमध्ये ढिगाऱ्यांखाली अडकलेली लोकं शोधली जात आहे. बचाव पथकांनी दोन दिवसांत आणखी ६५० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
अजूनही सुमारे ३०० लोक यात अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथके त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या कामात गुंतली असून, शोध आणि बचाव कार्यासाठी श्वान पथके, ड्रोन आणि भूमिगत रडारचा वापर केला जात आहे. हर्षिल खोऱ्यात मोबाईल कम्युनिकेशन सिस्टम पूर्ववत करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी गेल्या तीन दिवसांपासून उत्तरकाशीमध्ये आहेत.
मुख्यमंत्री धामी काय म्हणाले?मुख्यमंत्री धामी हे धरालीमध्ये सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. गुरुवारी ४५० आणि शुक्रवारी २५० लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे सीएम धामी यांनी सांगितले. अडकलेल्या उर्वरित लोकांना लवकरच सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबतही त्यांनी सांगितले. एसडीआरएफने माहिती देताना म्हटले की, नऊ सैनिक आणि इतर सात लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्याच वेळी, स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की बेपत्ता लोकांची संख्या जास्त असू शकते.
यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी
धरालीमध्ये अनेक हॉटेल्स बांधली जात होती. बिहार आणि नेपाळमधील कामगार हॉटेल्सच्या बांधकामात गुंतले होते. हॉटेल्समध्ये दोन डझनहून अधिक लोक होते. त्यापैकी बरेच जण अजूनही बेपत्ता आहेत. कोणताही पत्ता लागलेला नाही. धराली, हर्षिल आणि उत्तरकाशी दरम्यान अनेक ठिकाणी रस्ते तुटलेले आहेत. यामुळे मदत आणि बचाव कार्य करण्यात अडचणी येत आहेत.
मात्र, आता मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा पूर्ववत झाल्यामुळे बचाव कार्याला वेग येईल अशी अपेक्षा आहे. बाधित भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जनरेटरची व्यवस्था केली जात आहे.