६० टक्के मुस्लिम महिलांना ‘एकतर्फी’ घटस्फोट
By Admin | Updated: November 8, 2015 02:01 IST2015-11-08T02:01:37+5:302015-11-08T02:01:37+5:30
एकाच वेळी तीनदा ‘तलाक’ शब्द उच्चारून ६० टक्के मुस्लिम महिलांना पतीकडून एकतर्फी घटस्फोट दिला जातो, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.

६० टक्के मुस्लिम महिलांना ‘एकतर्फी’ घटस्फोट
नवी दिल्ली : एकाच वेळी तीनदा ‘तलाक’ शब्द उच्चारून ६० टक्के मुस्लिम महिलांना पतीकडून एकतर्फी घटस्फोट दिला जातो, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
या घटस्फोटित महिलांना त्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा स्थानिक काजीकडून मिळते. काही महिलांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे घटस्फोटाची माहिती मिळते, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.
‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’ या नावाच्या स्वयंसेवी संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. त्यात ९२ टक्के महिलांनी तीनदा ‘तलाक’ हा शब्द उच्चारून घटस्फोट घेण्यास विरोध केला असून, ही प्रक्रिया बदलण्याची मागणी केली आहे. घटस्फोट देण्यात आलेल्या महिलांपैकी ८० टक्के महिलांना चरितार्थासाठी भत्ता दिला जात नाही. त्याचवेळी त्यांच्या ‘निकाह’च्या वेळी मंजूर करण्यात आलेली मेहरची रक्कमही १६ टक्के महिलांना माहीत नाही, असेही हे सर्वेक्षण म्हणते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लुबना चौधरीने विपरित अनुभव सांगितले.
- या महिलेने सांगितले की, माझ्या पतीने मला प्रचंड मारहाण केली आणि माझ्या गर्भाशयात काचेचे तुकडे सापडले. २० व्या वर्षीच माझा विवाह झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच मी आई बनले. माझा पती वाईट सवयी असणारा होता. त्याचे कुटुंबाकडे मुळीच लक्ष नव्हते. त्याबाबत त्याच्याकडे विचारणा करताच त्याने मला मारहाण केली.
लुबनाला तिच्या पतीने आठवीची परीक्षाही देऊ दिली नाही. तिला घरातच कोंडून ठेवले. तिचे प्रचंड शारीरिक शोषण केले; तरी पण तिने हार मानली नाही. ती म्हणाली की, एके दिवशी पतीने दरवाजा बंद केला आणि रॉडने भयंकर मारहाण केली. त्याने मला किती बदडले हे मला माहीत नाही. दरवाजा उघडल्यानंतर माझ्या नातेवाईकांनी माझी भयंकर स्थिती पाहून मला इस्पितळात नेले.
या स्वयंसेवी संस्थेच्या सहसंस्थापक जाकिया सोमन यांनी घटस्फोटाच्या या पद्धतीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही समान नागरी कायद्याच्या बाजूने नाहीत; पण मुस्लिम पर्सनल कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने सर्वात अगोदर ‘ट्रिपल तलाक’वर बंदी घालण्याची आवश्यकता आहे.
लीगल स्कॉलर प्रोफेसर ताहीर महमूद म्हणाले की, या सर्वेक्षणातील निष्कर्ष भीतिदायक असून, समाजात इस्लामच्या नियमांचा दुरुपयोग होतो, हे त्यातून दिसून येते.