तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात प्रसिद्ध मैना कोल्लई महोत्सवादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. पालार नदीच्या काठावर मिरवणूक सुरू असताना ६० फूट उंचीचा भव्य रथ उलटल्याने ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून रथाची उंची वाढवण्यात आल्याने हा अपघात घडल्याचे समोर येत आहे.
दरवर्षीप्रमाणे पालार नदीच्या काठावर मैना कोल्लई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रविवारी १० गावांतील देवतांची सजवलेल्या रथांमधून मिरवणूक काढण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास कटपाडीजवळील काझिनजूर येथे हा ६० फुटी रथ नदीकाठाहून रस्त्यावर ओढला जात होता. यावेळी अचानक रथाचा तोल गेला आणि तो एका बाजूला उलटला. त्यावेळी रथाच्या आत १० लोक होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढला. यातील सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ आदुक्कमपराई येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सुब्बुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक शिवरामन आणि महसूल विभागीय अधिकारी सेंथिल कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे मंदिर प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सरकारी नियमांनुसार, मंदिरातील रथाची उंची १२ फुटांपेक्षा जास्त नसावी. मात्र, या उत्सवात विरुधंबट्टू, काझिनजूर आणि मोत्तूर येथील रथांची उंची तब्बल ६० फूट होती. दरम्यान, २०२३ मध्ये मोत्तूर गावातील एक रथ पालार नदीत पडला होता. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासनाने आता आयोजकांना कडक निर्देश दिले आहेत.
Web Summary : A 60-foot temple chariot toppled during the Maina Kollai festival in Tamil Nadu's Vellore district, injuring seven. The chariot's height exceeded permissible limits. An investigation is underway.
Web Summary : तमिलनाडु के वेल्लोर जिले में मैना कोल्लई उत्सव के दौरान 60 फुट का मंदिर रथ पलट गया, जिसमें सात लोग घायल हो गए। रथ की ऊंचाई अनुमेय सीमा से अधिक थी। जांच जारी है।