६० जणांची दृष्टी घालवणारा डॉक्टर अटकेत
By Admin | Updated: December 6, 2014 00:19 IST2014-12-06T00:19:57+5:302014-12-06T00:19:57+5:30
पंजाबातील गुरुदासपूर येथे डोळे तपासणी शिबिरादरम्यान मोतीबिंदूची कथित शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला शुक्रवारी अटक करण्यात आली.

६० जणांची दृष्टी घालवणारा डॉक्टर अटकेत
गुरदासपूर/नवी दिल्ली : पंजाबातील गुरुदासपूर येथे डोळे तपासणी शिबिरादरम्यान मोतीबिंदूची कथित शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला शुक्रवारी अटक करण्यात आली. याशिवाय एका खासगी इस्पितळावर तसेच मथुरा येथील एनजीओविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कथित शस्त्रक्रियेमुळे ६० जणांनी डोळे गमावल्याचे उघड झाले आहे.
केंद्र शासनाने राज्य सरकारकडे या घटनेचा अहवाल मागितला असून पंजाब सरकारने देखील घटनेच्या उच्चस्तर चौकशीचे आदेश दिले. अटकेत असलेल्या डॉक्टरचे नाव विवेक अरोरा असून तो जालंधरच्या आयकेअर सेंटरचा संचालक असल्याची माहिती गुरुदासपूरचे उपायुक्त अभिनव त्रिखा यांनी दिली. यासंदर्भात शिबीेर संयोजक मंजितसिंग यांना देखील ताब्यात घेण्यात आले.
गुरुवारी अमृतसर येथून आलेल्या वृत्तानुसार ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ६० जणांवर गुरुदासपूरच्या घुमान गावात आयोजित शिबिरात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
या सर्वांना डोळे गमवावे लागले. सर्वजण गरीब कुटुंबातील आहेत. यातील १६ जण अमृतसर जिल्ह्यातील गांवातील असून उर्वरित सर्वजण गुरुदासपूर येथील आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी याप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव विन्नी महाजन यांना उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती चंदीगड येथे शासकीय प्रवक्त्याने दिली.
सर्व पीडितांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय सर्व पीडितांच्या मोफत उपचाराचे आदेश देण्यात आले आहेत. नव्याने उपचार करण्यासाठी काय करता येईल याचीही माहिती घेण्यास सांगण्यात आले.
अमृतसरचे सिव्हिल सर्जन राजीव भल्ला यांच्या नोंदीनुसार मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अत्यंत घाणेरड्या वातावरणात करण्यात आल्यामुळे ६० लोकांनी डोळे गमावले. (वृत्तसंस्था)