यात्रेकरू व पर्यटकांना खोरे सोडण्याच्या सूचना
नवी दिल्ली/श्रीनगर : पाकिस्तानी दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे कारण सांगून केंद्र सरकारने काश्मीर खोºयात शुक्रवारी आणखी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २८0 कंपन्या (२८ हजार सशस्त्र पोलीस) पाठवल्याने श्रीनगर व संपूर्ण खोºयाला लष्करी तळाचे स्वरूप आले आहे. केंद्राने २५ जुलै रोजी १0 हजार सशस्त्र सैनिक पाठवले होते. याखेरीज काश्मीर खोºयात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ६५ हजार जवान तैनात असून, अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने आणखी २0 बटालियन पाठवण्यात आल्या होत्या. सशस्त्र दलाचे सुमारे एक लाख पोलीस काश्मीर खोºयात आता असून, त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीरमधील कायदा व सुव्यवस्था यासाठी तसेच दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इतके सशस्त्र पोलीस रवाना करण्यात आले आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. पण अचानक इतक्या सशस्त्र पोलिसांना तिथे पाठवण्याची गरज आता का भासावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अमरनाथ यात्रेकरू तसेच खोºयात फिरायला आलेले पर्यटक यांनी ताबडतोब तेथून निघावे, अशा सूचनाही केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व यात्रेकरूही घाबरून गेले असून, तेथून मिळेल त्या मार्गाने जम्मूकडे येण्यासाठी त्यांची घाई सुरू झाली आहे. दहशतवादी हल्ल्याचे कारण सांगून त्यांना तेथून निघून जाण्याच्या सूचना दिल्याने आपल्यावर लगेच हल्ले सुरू होतील की काय, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यातच अमरनाथच्या मार्गावर पाकिस्तानी बनावटीचे भूसुरुंग व शस्त्रे मोठ्या प्रमाणात आढळल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तिथे प्रचंड घबराट आहे. सरकारने काश्मीर खोºयात इतकी घबराट का निर्माण केली आहे, इतके सशस्त्र सैनिक खोºयात अचानक का पाठवण्यात आले आहेत, याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारनेही दिलेले नाही. त्यामुळे तिथे अनेक अफवा पसरल्या आहेत. जम्मू-काश्मीर राज्याचे त्रिभाजन करण्याचा सरकारचा विचार असल्याची अफवाही त्यात आहे. काश्मीर खोरे, जम्मू व लडाख असे त्रिभाजन करण्याची केंद्र सरकार तयारी करीत आहे, असे अनेकांना वाटत आहे.