जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका माजी जवानाचा मृत्यू झाला होता. तसेच त्यांची पत्नी आणि नातेवाईकासह दोन महिला जखमी झाल्या होत्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, किमान दोन दहशतवाद्यांनी जिल्ह्यातील बेहीबाग परिसरामध्ये मंजूर अहमद वागे, त्याची पत्नी आणि एका नातेवाईकावर घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तोयबाची दहशतवादी संघटना असलेल्या टीआरएफने घेतली होती. दरम्यान, या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जोरदार कारवाई करत ५०० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
कुलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेनंतर केवळ १२ तासांमध्येच जम्मू-काशमीर पोलिसांनी संपूर्ण काश्मीरमध्ये रात्रभर धाडसत्र चालवत संशयित, दहशतवाद्यांचे सहकारी आणि दहशतवादी कारवायात आधी सहभागी असलेल्या ५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतलं आहे. याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही दहशतवादी नेटवर्शी संबंधित लोकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी खोऱ्यामध्ये व्यापक कारवाई सुरू केली आहे. या प्रकारचे इतर संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आणि काल झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांना पकडण्यासाठी ५०० हून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यामध्ये असे दहशतादी हल्ले होण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. या हल्ल्यांमध्ये निशस्त्र माजी लष्करी आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना लक्ष्य बनवलं जाऊ शकतं. याबाबत संपूर्ण काश्मीरमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, टीआरएफने या पुढेही अशा प्रकारचे हल्ले करण्यात येतील असा इशारा दिला आहे.