ममतांचे कार्टून शेअर करणाऱ्या प्राध्यापकास ५० हजार भरपाई
By Admin | Updated: March 10, 2015 23:21 IST2015-03-10T23:21:41+5:302015-03-10T23:21:41+5:30
वर्ष २०१२ चा रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी

ममतांचे कार्टून शेअर करणाऱ्या प्राध्यापकास ५० हजार भरपाई
कोलकाता : वर्ष २०१२ चा रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे एक व्यंगचित्र इंटरनेटवर टाकल्याबद्दल अटक केले गेलेले जादवपूर विद्यापीठाचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक अंबिकेश महापात्र यांना पश्चिम बंगाल सरकारने ५० हजार रुपये भरपाई द्यावी, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
प्रा. महापात्र यांनी त्यांना इतर कोणाकडून तरी मेलवर आलेली ममता बॅनर्जी व त्यांचे त्यावेळचे विश्वासू मुकुल राय यांची व्यंगचित्रे काही जणांना ‘फॉरवर्ड’ केली होती. ममतांचे ते व्यंगचित्र सत्यजित रे यांच्या ‘सोनार केल्ला’ (सुवर्ण किल्ला) या चित्रपटातील पात्रावर बेतलेले होते. प्रा. महापात्र यांनी यासाठी ज्या कॉम्प्युटरचा वापर केला त्याचा आयपी अॅड्रेस त्यांच्या हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुब्रत सेनगुप्ता यांच्या नावावर नोंदलेला होता. दक्षिण कोलकत्यातील जादवपूर पूर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी यावरून माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली महापात्र व सेनगुप्ता यांना एप्रिल २०१२ मध्ये अटक केली होती.(वृत्तसंस्था)