साखरेवरील आयात कर ५० टक्के
By Admin | Updated: July 11, 2017 04:26 IST2017-07-11T04:26:59+5:302017-07-11T04:26:59+5:30
केंद्र सरकारने सोमवारी साखरेवरील आयात करात १० टक्क्यांनी वाढ करत तो ४० वरून ५० टक्के केला

साखरेवरील आयात कर ५० टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी साखरेवरील आयात करात १० टक्क्यांनी वाढ करत तो ४० वरून ५० टक्के केला. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर घसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात साखरेची आयात होऊन देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचेही दर घसरतील आणि त्याचा फटका साखर कारखानदारीला बसेल. परिणामी कारखान्यांना ऊसबिले देताना अडचणी येतील, या शक्यतेने साखरेवरील आयात कर ६० टक्के करावा, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) सरकारकडे केली होती.
केंद्रीय अन्न मंत्रालयानेही साखरेच्या आयात करात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी साखरेवरील आयात कर ४० वरून ५० टक्के करण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली. हा कर कधीपर्यंत असेल याची तारीख नमूद नाही. देशातील साखरेची मागणी २४० ते २५० लाख टन आहे. साखरेचे उत्पादन २०१६-१७ च्या साखर हंगामात २५० लाख टनावरुन २१० लाख टनांपर्यत घसरले होते. मागणी -पुरवठ्यातील तफावत भरून शक्यता लक्षात घेवून केंद्राने एप्रिल महिन्यात साखर कारखान्यांना ५ लाख टन कच्ची साखर करमुक्त आयात करण्याला परवानगी दिली होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर घसरले आहेत. ब्राझीलची अतिरिक्त ३ लाख टन साखर आयात करण्याचे करार झाले असल्याचेही वृत्त आहे.