५० लाख जप्त

By Admin | Updated: August 28, 2015 00:30 IST2015-08-28T00:30:53+5:302015-08-28T00:30:53+5:30

दोघांना अटक : चर्चेला उधाण : हवालाची रोकड?

50 million seized | ५० लाख जप्त

५० लाख जप्त

घांना अटक : चर्चेला उधाण : हवालाची रोकड?
नागपूर : ॲक्टिव्हावरून ५० लाखांची रोकड नेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. विकास बाबूराव जाधव (वय २७, रा. गरुडखांब, रेणुका माता मंदिराजवळ) आणि मनीष हेमराज चावरे (वय २३, रा. खापरीपुरा, इतवारी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली रोकड हवालाचीच असावी, असा दाट संशय आहे.
बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता लकडगंज परिसरात गुन्हे शाखेचे पथक गुन्हेगारांचा शोध घेत होते. त्यांना रेणुका माता मंदिराकडून टांगास्टॅण्ड मार्गावर एका ॲक्टिव्हावर (एमएच ४९/ व्ही २६४४) दोन तरुण येताना दिसले. पोलीस समोर होताच ॲक्टिव्हा चालक घाबरल्यासारखा झाला. ते पाहून पोलिसांचा संशय बळावला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर ढोले, सपोनि मंगेश देसाई, हवालदार प्रमोद कोहळे, शैलेश ठवरे, नायक कुलदीप पेठकर, मनीष भोसले, फिरोज आणि मिलिंद नारसन्ने यांनी दुचाकीस्वारांना थांबवले. बॅगमध्ये काय आहे, अशी विचारणा केली असता काहीच नाही, असे ते म्हणाले. पोलिसांनी बॅगची पाहणी केली तेव्हा त्यात हजार आणि पाचशेंच्या नोटांचे बंडल आढळले. ही बॅग मनीष चावरेजवळ होती. रक्कम कुठून आणली, कुणाला देण्यासाठी जात आहे, अशी विचारणा केली असता ते असंबद्ध उत्तर देऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना गुन्हे शाखेत नेले. ही रक्कम कुणाच्या मालकीची आहे, त्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याने पोलिसांनी जाधव आणि चावरेला अटक केली.
---
ते खाते कुणाचे?
ही रोकड ॲक्सिस बँकेतून काढण्यात आली, ती अहमदनगर येथील एका बँकेच्या खातेधारकाच्या खात्यात जमा होणार होती. हा खातेधारक कोण, रक्कम कशासाठी जमा केली जाणार होती, त्याची चौकशी आता पोलीस करीत आहेत. बुधवारी ३७ लाखांचे सोने जप्त करणाऱ्या गुन्हे शाखेने याच दिवशी ५० लाखांची रोकड पकडल्यामुळे गुन्हे शाखा आक्रमक झाल्याची प्रचिती आली असून, कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.
--

Web Title: 50 million seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.