४९ दिवसांनी जम्मूत सरकार
By Admin | Updated: March 2, 2015 04:22 IST2015-03-01T23:49:33+5:302015-03-02T04:22:55+5:30
जम्मू-काश्मीरच्या राजकीय इतिहासात रविवारी प्रथमच भारतीय जनता पक्ष व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे सरकार अस्तित्वात आले़ पीडीपीचे

४९ दिवसांनी जम्मूत सरकार
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजकीय इतिहासात रविवारी प्रथमच भारतीय जनता पक्ष व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे सरकार अस्तित्वात आले़ पीडीपीचे संरक्षक मुफ्ती मोहंमद सईद यांनी १२ वे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली़ भाजपचे डॉ़ निर्मल सिंह यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली़ याचसोबत राज्यातील ४९ दिवसांची राज्यपाल राजवट संपुष्टात आली.
जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न होते़ आज ते पूर्ण झाले़ पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्वप्नपूर्तीच्या आनंदाचे साक्षीदार ठरले़ त्यांच्यासह भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, पक्षाध्यक्ष अमित शहा व सरचिटणीस राम माधव आदींची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती होती़
जम्मू विद्यापीठाच्या जनरल जोरावर सिंह सभागृहात पीडीपी-भाजप आघाडी सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला़ यावेळी पीडीपीच्या १३ आणि भाजपच्या ११ मंत्र्यांनी शपथ घेतली़ यात १६ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्री आहेत़ नव्या मंत्रिमंडळात भाजपच्या प्रिया सेठी आणि पीडीपीच्या आसिया नकाश या दोन महिलांची वर्णी लागली़
भाजप बॅकफूटवर
शपथविधी सोहळ्यानंतर सईद आणि निर्मलसिंह यांनी १६ पानांचा ‘अजेंडा आॅफ दल अलायन्स’ जारी केला़ आपल्या राष्ट्रीय अजेंड्यात जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचे आश्वासन देणारी भाजप यानिमित्ताने बॅकफूटवर आलेली दिसली़ कलम ३७० वर यथास्थिती कायम ठेवण्यावर भाजपने ‘अजेंडा आॅफ दल अलायन्स’मध्ये सहमती दर्शविली़
सज्जाद गनी लोण यांचीही वर्णी
जम्मू-काश्मीरमधील माजी फुटीरवादी नेते व पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद गनी लोण यांचीही पीडीपी- भाजप आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली़ (वृत्तसंस्था)