काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर मत चोरीचे गंभीर आरोप केले. या आरोपानंतर काँग्रेसने पुन्हा एक मोठा दावा केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील मतदार यादीतील कथित अनियमितता उघड करण्यासाठी ऑडिट सुरू करणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी रविवारी दिली. "४८ मतदारसंघ असे होते तिथे 'इंडिया' आघाडीचे उमेदवार ५०,००० पेक्षा कमी मतांनी पराभूत झाले आणि पक्ष त्या सर्वांची चौकशी करणार आहे, असेही वेणुगोपाल म्हणाले.
यावेळी वेणुगोपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या जनादेशाने पदभार स्वीकारला नाही असा आरोप केला. राहुल गांधी यांनी निवडणूक घोटाळ्याचे पुरावे जाहीर केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे असा दावा त्यांनी केला. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेल्या मतदार यादीतील कथित अनियमिततेवर गांधी यांनी काही स्फोटक खुलासे केले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत मतदार यादीत फेरफार करून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला असा आरोप त्यांनी केला आहे. योग्य चौकशी झाल्यास मोदींना राजीनामा द्यावा लागू शकतो, असे ते म्हणाले.
'आम्हाला धमकावले जात आहे- वेणुगोपाल
वेणुगोपाल यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतल्याबद्दल गांधी आणि काँग्रेसला धमकावल्याचा आरोप केला. 'निवडणूक आयोगाने अद्याप नोंदवलेल्या अनियमिततेवर उत्तर दिलेले नाही', असा दावा केला. त्यांनी आयोगाला आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करू नका असे सांगितले. ते म्हणाले की, काँग्रेस आपला लढा सुरूच ठेवेल. त्यांनी ११ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर निषेध मोर्चाची घोषणा केली, याचे नेतृत्व पक्षाचे खासदार करतील.
काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी त्रिशूर आणि अलाप्पुझा मतदारसंघाचे उदाहरण देऊन केरळमधील मतदार यादीत बनावट मतदारांची नावे समावेश केल्याचा आरोपही केला.