दुपारी ३ पर्यंत दिल्लीत ४८ टक्के मतदान
By Admin | Updated: February 7, 2015 15:33 IST2015-02-07T10:19:30+5:302015-02-07T15:33:34+5:30
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानप्रक्रिया सुरु असून दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे ४८ टक्के मतदान झाल्याचे समजते.

दुपारी ३ पर्यंत दिल्लीत ४८ टक्के मतदान
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानास शनिवारी सुरूवात झाली असून दिल्लीकर मोठ्या उत्साहाने मतदानास बाहेर पडत आहेत. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब राग लागलेल्या दिसत आहेत असन दुपारी ३ पर्यंत ४८ टक्के मतदान झाले आहे.
सकाळी ८ वाजता मतदानास सुरूवात झाली असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येईल. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन अखेर निकाल लागेल. काँग्रेस , आम आदमी पक्ष आणि भाजपामध्ये मुख्य लढत दिसत आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी तब्बल ५५ हजार पोलिस व निमलष्करी दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दिल्लीतील १ कोटी ३३ लाख मतदार विधानसभेच्या ७० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत. भाजपा, काँग्रेस, आम आदमी पक्ष व अन्य पक्षांचे मिळून ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १२ हजार ७७७ मतदान केंद्रावर मतदान पार पडणार असून ७१४ मतदाने केंद्र संवेदनशील व १९१ मतदान केंद्र अतिसंवदेनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, आप प्रमुख अरविंद केजरीवाल, भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींसह अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला.