४४० महिलांना जननी सुरक्षाचे कवच
By Admin | Updated: May 23, 2014 00:46 IST2014-05-23T00:27:31+5:302014-05-23T00:46:42+5:30
नाशिक : प्रसूतीसाठी येणार्या महिलांना सुरक्षित प्रसूतीबरोबरच अन्य उपचार आणि अन्य कारणांसाठी महापालिकेने जननी सुरक्षा योजनेचे कवच दिले असून, त्याअंतर्गत ४४० महिलांनी लाभ घेतला आहे. याशिवाय जननी शिशू सुरक्षा योजनेचीही अंमलबजावणी करण्यात येत आहे.

४४० महिलांना जननी सुरक्षाचे कवच
नाशिक : प्रसूतीसाठी येणार्या महिलांना सुरक्षित प्रसूतीबरोबरच अन्य उपचार आणि अन्य कारणांसाठी महापालिकेने जननी सुरक्षा योजनेचे कवच दिले असून, त्याअंतर्गत ४४० महिलांनी लाभ घेतला आहे. याशिवाय जननी शिशू सुरक्षा योजनेचीही अंमलबजावणी करण्यात येत आहे.
महापालिकेच्या प्रसूतिगृहातच किंवा रुग्णालयातच सुरक्षित प्रसूती झाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जननी सुरक्षा योजना चार वर्षांपूर्वी अंमलात आणण्यात आली. महापालिकेच्या प्रसूतीगृहात प्रसूत होणार्या महिलेस ६६० रुपये उपचार आणि अन्य कारणांसाठी दिले जातात. वर्षभरात या योजनेचा ४४० महिलांनी लाभ घेतला आहे. त्याचप्रमाणे घरी प्रसूत झालेल्या महिलेस उपचारासाठी पाचशे रुपये दिले जातात. त्याचादेखील एका महिलेने लाभ घेतला आहे. त्यामुळे लाभार्थींवर एकूण दोन लाख ६४ हजार ५०० रुपये खर्च करण्यात आले आहेत. योजनेतील अर्जांची छपाई तसेच इतर स्टेशनरी खर्चाचा विचार केला तर एकूण तीन लाख पाच हजार ४९१ रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी दिली.
या योजनेप्रमाणेच शासनाच्या जननी शिशू सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या योजनेअंतर्गत महापालिकेच्या प्रसूतिगृहात दाखल होणार्या महिलेचा आणि नवजात शिशूचा संपूर्ण खर्च महापालिका करते. प्रसूत झालेल्या महिलेला तिच्या घरापर्यंत रुग्णवाहिकेतून पोहोचवण्याची व्यवस्था आहे. मनपाच्या प्रसूतिगृहात दाखल महिला शासनाच्या विशेष रुग्णवाहिका सेवेसाठी असलेल्या दूरध्वनी क्रमांक १०८ चा फायदा घेतात; परंतु महापालिकेला विनंती केल्यास रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते.