व्हॉट्सअॅपवर तक्रारी मागवणा-या उपमुख्यमंत्र्यांना आले 44 हजार विवाहाचे प्रस्ताव
By Admin | Updated: October 21, 2016 19:46 IST2016-10-21T19:31:21+5:302016-10-21T19:46:50+5:30
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना व्हॉट्सअॅप नंबरवर तब्बल 44 हजार विवाहाचे प्रस्ताव आले आहेत.

व्हॉट्सअॅपवर तक्रारी मागवणा-या उपमुख्यमंत्र्यांना आले 44 हजार विवाहाचे प्रस्ताव
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 21 - सोशल मीडियावर दिलेल्या एखाद्या सुविधेचा वापर लोकांकडून कशासाठी केला जाईल याचा काही नेम नाही. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सध्या याचाच प्रत्यय येतोय. राज्यातील खराब रस्त्यांबाबत तक्रार करण्यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी व्हॉट्सअॅप नंबर दिला होता. मात्र या नंबरवर रस्त्यांच्या तक्रारी येण्याऐवजी अविवाहित उपमुख्यमंत्र्यांसाठी विवाहाचे प्रस्ताव येत आहेत. आतापर्यंत या व्हॉट्सअॅप नंबरवर तब्बल 44 हजार विवाहाचे प्रस्ताव आले आहेत.
क्रिकेटमधून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या तेजस्वी यादव यांनी लहान वयातच बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा स्विकारली होती. बिहारमधील हजारो तरुणींनी तेजस्वी यादव यांना विवाहाचे प्रस्ताव पाठवले आहेत. त्यामुळे या व्हॉट्सअॅप नंबरचा चक्क मॅरेज ब्युरो बनून गेला आहे. "राज्यातील खराब रस्त्यांबाबत तक्रार करण्यासाठी देण्यात आलेल्या या व्हॉट्सअॅप क्रमांकावर 47 हजार मेसेज आले आहेत. त्यापैकी 44 हजार मेसेज हे तेजस्वी यादव यांना विवाहाचे प्रस्ताव देणारे होते. तर केवळ 3 हजार मेसेज हे रस्त्यांसंबंधी तक्रारी करणारे होते,'' असे एका बिहार सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.
तेजस्वी यादव यांना विवाहाचा प्रस्ताव देणाऱ्या तरुणींपैकी अनेक तरुणींनी आपली फिगर साइझ, वर्ण, उंची अशी वैयक्तिक माहितीसुद्धा टाकली आहे. या सर्व प्रकाराबाबत विचारणा केली असता तेजस्वी यादव यांना हसू आवरता आले नाही. ''नशीब मी अजून अविवाहीत आहे. जर मी विवाहित असतो आणि असा प्रकार घडला असता तर मात्र मला अडचणींचा सामना करावा लागला असता," असे तेजस्वी यादव म्हणाले. तसेच आपण अरेंज मॅरेजलाच प्राधान्य देणार असल्याचे तेजस्वी यांनी सांगितले.