चंदिगडमध्ये कोविड-19 संक्रमणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राजकुमार (४०) असे या तरुणाचे नाव आहे.तो सेक्टर-32 मधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये (जीएमसीएच-32) दाखल होता. हा तरुण मुळचा उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील रहिवासी होतो आणि पंजाबमधील लुधियाना येथे राहत होता.
संबंधित रुग्णाला चार दिवसांपूर्वी श्वास घ्यायला त्रास होत होता. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांकडून कसलीही सुधारणा होत नसल्याने, त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे, बुधवारी त्याचा मृत्यू झाला.
रुग्णालयात विशेष आयसोलेशन युनिट -यासंदर्भात बोलताना जीएमसीएच-32 चे डायरेक्टर डॉ. ए.के. अत्रे यांनी, संक्रमित रुग्णाला तत्काळ आयसोलेट करून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते, मात्र गंभीर लक्षणांमुळे त्याला वाचवता येऊ शकले नाही, अशी पुष्टी केली आहे. दरम्यान, रुग्णालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 बेडचे एक आयसोलेशन युनिट तयार केले आहे.
यापूर्वी, 23 मेरोजी मोहाली येथे हरियाणातील यमुनानगर येथील 51 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्या पंजाब येथे एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गेल्या होत्या.
दक्षता वाढली, कोविड टेस्टिंगला वेग -पीजीआय आणि जीएमसीएच-32 ने कोविड टेस्टिंग आणि दक्षता वाढवली आहे. यासंदर्भात बोलताना, सध्या भयभीत होण्याची कसलीही आवश्यकता नाही. परंतु कोविडचे अप्रत्याशित स्वरूप दुर्लक्षित करता येणार नाही. खोकला, ताप किंवा सर्दी अशी लक्षणे आढळल्यास त्वरित टेस्ट करावे, असे आवाहन पीजीआयच्या तज्ज्ञ डॉ. पीव्हीएम लक्ष्मी यांनी केले आहे.
तसेच, सध्याचे लसीकरण अद्यापही प्रभावी आहे. मात्र, नवीन व्हेरिअन्ट वेगाने पसरला तर बूस्टर डोस अथवा नवीन लसीकरण मोहीम सुरू केली जाऊ शकते, असेही डॉ. लक्ष्मी यांनी म्हटले आहे.