४ बायका, ४० मुलंवालेच लोकसंख्यावाढीस कारणीभूत - साक्षी महाराज

By Admin | Updated: January 7, 2017 15:56 IST2017-01-07T15:54:55+5:302017-01-07T15:56:15+5:30

देशातील लोकसंख्यावाढीस हिंदू नव्हेत तर ४ बायका आणि ४० मुलं असणारे जबाबदार आहेत' असे विधान करत भाजपा खासदार साक्षी महाराजांनी मुस्लिंमावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

4 wives, 40 children grow up in population - Sakshi Maharaj | ४ बायका, ४० मुलंवालेच लोकसंख्यावाढीस कारणीभूत - साक्षी महाराज

४ बायका, ४० मुलंवालेच लोकसंख्यावाढीस कारणीभूत - साक्षी महाराज

>ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. ७ - सतत काही ना काही वादग्रस्त वक्तव्ये करून खळबळ माजवणारे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एक बेताल वक्तव्य करत नवा वाद ओढवून घेतला आहे. 'देशातील लोकसंख्यावाढीस हिंदू नव्हेत तर ४ बायका आणि ४० मुलं असणारे जबाबदार आहेत' असे विधान करत त्यांनी मुस्लिम समाजावर अप्रत्यक्षपणे टीका केली.  
पुढील महिन्यापासून उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांचे पडघम वाजणार असून त्याच पार्श्वभूमीवर राजकारणालाही रंग चढला आहे. मेरठमधील एका मंदिराच्या उद्घाटनादरम्यान बोलताना त्यांनी लोकसंख्यावाढीला एक विशेष धर्मच जबाबदार आहे, असे वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे मुस्लिम नागरिकांवर निशाणा साधला. 
' हिंदू असो वा मुस्लिम माता, त्यांचा सन्मान ठेवायलाच हवा,' असे ते म्हणाले. तसेच चार विवाह आणि ‘तलाक’ प्रथेवरून जोरदार टीका केली. मात्र लोकसंख्यावाढीच्या वक्तव्यावरून वातावरण तापल्यानंतर त्यांनी अचानक घूमजाव करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ' मी कोणत्याही विशिष्ट धर्माचा उल्लेख केला नव्हता, माझं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवून त्याचा विपर्यास करण्यात आला' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 
दरम्यान भाजपाने मात्र साक्षी महाराजांच्या या वक्तव्याबाबत सावध पवित्रा घेतला असून ते साक्षी महाराज यांचे वैयक्तिक मत असून पक्षाची भूमिका नसल्याचेही स्पष्ट केले.

Web Title: 4 wives, 40 children grow up in population - Sakshi Maharaj