387 agents of black ticket stamps arrested | रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ३८७ एजंटांना अटक
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ३८७ एजंटांना अटक

पुणे : रेल्वे सुरक्षा दल व इतर विभागांनी देशभरात ‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत एकाच दिवशी केलेल्या कारवाईत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचे जाळे उद्ध्वस्त केले. देशभरातून तब्बल ३८७ तिकीट एजंटांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ३३ लाख रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. आरोपींनी ३ कोटी २५ लाख रुपये किमतीची तिकिटे बेकायदेशीरपणे विकल्याचेही समोर आले आहे.

मागील दोन महिने शाळा-महाविद्यालयांची उन्हाळी सुटी, लग्नाचे मुहूर्त यामुळे सर्वच रेल्वेगाड्यांना गर्दी होती. लांबपल्ल्याच्या बहुतेक गाड्यांचे आरक्षण संपले होते. या काळात काही एजंटांकडून तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. काही तिकीट एजंट तिकीट खिडकीसह ई-तिकिटींग सुविधेचा दुरुपयोग करून तिकीट खरेदी करून प्रवाशांना जादा दराने विकत होते. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळण्यात अडचणी येत होत्या.

या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी रेल्वेच्या तांत्रिक व आयटी कक्षाच्या मदतीने संबंधित तिकीट एजंटांची माहिती जमा केली. त्यानंतर त्यांनी देशभरात एकाच दिवशी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईला ‘आॅपरेशन थंडर’ असे नाव देण्यात आले. त्यानुसार १३ जून रोजी १४१ शहरांमधील २७६ ठिकाणी छापा टाकण्यात आला.

संगणकप्रणाली जप्त
विविध ठिकाणी ३८७ जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, तसेच संशयित युझर आयडी आणि जप्त तिकिटे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोटा (राजस्थान) येथून ‘एएनएमएस’ आणि रेड मिर्ची ही संगणक प्रणाली जप्त केली आहे.

ऑपरेशन थंडर
‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मध्य रेल्वेने केलेल्या कारवाईत ३५ जणांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून ६८ लाख २५ हजार ४९९ रुपये किंमतीची ३ हजार ५१५ तिकिटे जप्त केली आहेत. यामध्ये यापूर्वीच्या प्रवासाची ६२ लाख ८० हजार ८९१ रुपये किमतीची तिकिटे आहेत. उर्वरित ५ लाख ४४ हजार ६०८ रुपये किमतीची तिकिटे यापुढील प्रवासाची आहेत. ही कारवाई पुण्यासह चिंचवड, पिंपरी, घाटकोपर, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, नागपूर, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, शिर्डी, सोलापूर आणि सांगली या ठिकाणच्या २१ खासगी ट्रॅव्हल एजन्सी आणि १२ आरक्षण केंद्रांमध्ये करण्यात आली.

Web Title: 387 agents of black ticket stamps arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.