गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य अनैतिक संबंध आणि त्यामधून घडणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलं आहे. तसेच या संबंधांमध्ये वय, नाती यांच्याही मर्यादा उरलेल्या नाहीत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील सिकंदराराऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात अनैकित संबंधांमधून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका सहा वर्षांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तर एका तरुणालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उर्वी नावाची सहा वर्षांची मुलगी बुधवारी सकाळी १० वाजता तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह जवळच असलेल्या विहिरीत सापडला. हा मृतदेह एका तागाच्या गोणीत भरलेला होता. तसेच मृतदेहाच्या गळ्यात कपडा बांधलेला होता.
पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सदर व्यक्तीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक कुमार सिंह यांनी सांगितले की, या मुलीने आरोपी महिला आणि एका अल्पवयीन मुलाला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. तसेच ही बाब वडिलांना सांगण्याची धमकी तिने दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने या मुलीची गळा आवळून हत्या केली होती.
पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी महिलेने मागच्या तीन महिन्यांपासून तिचे एका १७ वर्षीय मुलासोबत संबंध असल्याचे मान्य केले. ही घटना घडली त्या दिवशी सदर महिलेचा पती आणि सासू घराबाहेर गेले होते. ही संधी साधून तिने या मुलाला घरात बोलवले होते. तसेच त्यांचे अश्लील चाळे सुरू होते.
या दरम्यान, या महिलेची मुलगी अचानक तिथे आली. तसेच तिने याबाबत वडिलांना सांगण्याची धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेली महिला आणि तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मुलाने या मुलीची हत्या केली. तसेच तिचा मृतदेह एका गोणीमध्ये भरून रिकामी विहिरीत फेकून दिला. अटक करण्यात आली तेव्हा आरोपी महिलेच्या हातावर चावल्याच्या खुणा होत्या. या खुणा मुलीने जीव वाचवण्याचा प्रयत्नात चावा घेतल्याने झाल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.