नवी दिल्ली - महाराष्ट्रात सध्या ऑपरेशन टायगरची चांगलीच चर्चा सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंकडील नेते गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात काही आमदार, खासदार संपर्कात असल्याचाही दावा करण्यात येत आहे. या घडामोडीतच शिंदे गटातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी स्नेहभोजनाला ठाकरे गटातील ३ खासदारांनी हजेरी लावली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. आदित्य ठाकरे हेदेखील दिल्लीत असून ते इंडिया आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
आज सकाळी आदित्य ठाकरेंनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ठाकरेंचे ३ खासदार स्नेहभोजनाला मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी गेल्याचं विचारण्यात आले. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की, नागपूरात जसं वातावरण असते तसे दिल्लीत आहे, अधिवेशन काळात लोक एकमेकांना भेटतात. कुणी कुणाला भेटायचे हे त्यांनी ठरवायचे आहे. महाराष्ट्रात बहुमताने सरकार बसलेले आहे. आमचा पक्ष जेवढा फोडायचा असेल तेवढा फोडा, ज्यांना घ्यायचं असेल त्यांना घ्या. जे भ्रष्ट असतील त्यांना घ्या. आम्ही डाग आहे बोलत नाही भाजपा बोलते. पण हे सर्व झाल्यानंतर तुमच्या जाहीरनाम्यात मांडलेले विषय कधी सोडवणार हे सांगा असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय मागील ३ महिन्यापासून महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवर वाद आहे. मुख्यमंत्री कोण होणार त्यासाठी १०-१५ दिवस वाद चालला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, ते झाल्यानंतर पालकमंत्री कोण यावरून अजूनही वाद सुरू आहेत. स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाही. जनतेच्या प्रश्नावर कुणी बोलत नाही. लाडकी बहीण योजनेत २१०० रूपये देणार ते सुरू केले का, लाडका भाऊ योजनेत १० हजार देणार ते सुरू केले का? अनेक गोष्टी महाराष्ट्र करणार असं सांगितले पण अजून सुरू नाही असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला.
दरम्यान, कुणी कुणाचं कौतुक करावे हा त्यांचा विषय आहे. पण ज्या एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबतच नव्हे तर महाराष्ट्राशी गद्दारी केली. अनेक लोक पक्ष सोडतात, पक्षातून बाहेर जातात पण यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं पाप, दिलेले नाव चोरण्याचं पाप, चिन्ह चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेंनी केले आहे, त्याचा आम्हाला राग आहे. महाराष्ट्रात जी सुख, शांती, समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो तेदेखील दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप शिंदेंनी केले आहे असं सांगत दिल्लीत आज शरद पवारांना भेटणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली आहे.