काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान
By Admin | Updated: July 17, 2017 22:53 IST2017-07-17T22:53:43+5:302017-07-17T22:53:43+5:30
काश्मीरमध्ये आज सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला

काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 17- काश्मीरमध्ये आज सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. श्रीनगरमधल्या अनंतनागच्या वानी हमा गावात 3 दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आलंय. या परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सीआरपीएफच्या जवानांनी सर्च ऑपरेशनंही राबवलं.
सुरक्षा जवानांना दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग येथील एका गावात दहशतवादी असल्याची सूचना मिळाली. त्यानंतर जवानांनी पूर्ण परिसराला वेढा घातला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांची नावं साद, जिब्रान आणि नासिर अशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या सात महिन्यांत लष्कराने जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळून एकूण १०२ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर अनेक दहशतवादी लष्कराच्या हिट लिस्टवर आहेत. गेल्या सात वर्षांत जानेवारी ते जुलैदरम्यान चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ही सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.