२ जी प्रकरणी शुक्रवारी सुनावणी
By Admin | Updated: May 29, 2014 04:15 IST2014-05-29T04:15:01+5:302014-05-29T04:15:01+5:30
माजी दूरसंचारमंत्री ए़ राजा, द्रमुक खासदार कनिमोई आणि अन्य सात आरोपींच्या जामीन अर्जावर दिल्लीचे एक न्यायालय येत्या शुक्रवारी(३० मे) सुनावणी करणार आहे़

२ जी प्रकरणी शुक्रवारी सुनावणी
नवी दिल्ली : २ जी स्पेक्ट्रम प्रकरणाशी संबंधित एका मनिलाँड्रिंग प्रकरणासंदर्भात माजी दूरसंचारमंत्री ए़ राजा, द्रमुक खासदार कनिमोई आणि अन्य सात आरोपींच्या जामीन अर्जावर दिल्लीचे एक न्यायालय येत्या शुक्रवारी(३० मे) सुनावणी करणार आहे़ अंमलबजावणी संचालनालयाने यासंदर्भात आरोपपत्र दाखल केले होते़ आज बुधवारी विशेष सरकारी वकील यू़यू़ ललित यांनी जामीन अर्जावरील आपले उत्तर ३० मे रोजी दाखल करू, असे न्यायालयास सांगितले़ यानंतर सीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ़पी़ सैनी यांनी संबंधित प्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर याचदिवशी सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट केले़ (लोकमत न्यूज नेटवर्क) सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले की, अंमलबजावणी संचालनालयाद्वारे दाखल आरोपपत्र व अन्य दस्तऐवज अद्याप मिळालेले नाहीत़ यावर न्यायालयाने पुढील सुनावणीच्या दिवशी सर्व दस्तऐवज आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले़ सदर मनी लाँडरिंग प्रकरण २जी घोटाळ्याशी संबंधित आहे़ यात द्रमुक संचालित कलैगनार टीव्हीला स्वान टेलिकॉमने कथितरीत्या २०० कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे़