व्यापमंचा २७ वा बळी

By Admin | Updated: July 6, 2015 03:55 IST2015-07-06T03:55:07+5:302015-07-06T03:55:07+5:30

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेतील आणि भरतीतील अफाट हेराफेरीने गाजत असलेल्या मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यातील मृत्यूचे तांडव रौद्र रूप धारण करू पाहात आहे.

27th victim of business | व्यापमंचा २७ वा बळी

व्यापमंचा २७ वा बळी

नवी दिल्ली/ भोपाळ : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेतील आणि भरतीतील अफाट हेराफेरीने गाजत असलेल्या मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यातील मृत्यूचे तांडव रौद्र रूप धारण करू पाहात आहे. बोगस परीक्षार्थींचा तपास करणाऱ्या डॉ. अरुण शर्मा यांच्या मृत्यूने या घोटाळ्यातील २७वा बळी नोंदला गेला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरुण शर्मा यांचा रविवारी दिल्लीच्या हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने व्यापमं घोटाळ्याचे गूढ आणखी वाढले आहे.
६४वर्षीय डॉ. शर्मा हे जबलपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता होते. मेडिकल कौन्सिलकडून (एमसीआय) अगरताळा वैद्यकीय महाविद्यालयाचे निरीक्षण करण्यासाठी रविवारी सकाळीच ते विमानाने अगरतळ्याला प्रयाण करणार होते. नैर्ऋत्य दिल्लीतील द्वारका हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या डॉ. शर्मा यांचा मृतदेह रविवारी संशयास्पद स्थितीत आढळून आला. घोटाळ्याच्या तपासाशी संबंध असलेले आणि संशयास्पद मृत्यू झालेले ते दुसरे अधिष्ठाता आहेत. यापूर्वी तपास करणाऱ्या डी.के. साकल्ले यांचाही गूढ  मृत्यू झाला. हे दोन्ही मृत्यू वर्षभराच्या काळातील आहेत. या दोघांचीही हत्या झाली असावी, असा संशय इंडियन मेडिकल असोसिएशन जबलपूरचे जिल्हाध्यक्ष सुधीर तिवारी यांनी व्यक्त केला आहे.व्यापमं घोटाळ्याचा तपास उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एसआयटीकडून केला जात असून उच्च न्यायालय अन्य कोणत्याही संस्थेमार्फत तपासाचे आदेश देत असेल तर आमचा आक्षेप नाही. काँग्रेसने मागणी केल्याप्रमाणो सीबीआय तपासालाही आमचा विरोध नाही, असा खुलासा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केला. या प्रकरणातील प्रत्येक मृत्यू दु:खद आणि दुर्दैवी असून त्याबाबत तपास केला जावा. राज्य सरकारने यापूर्वीच उच्च न्यायालयाला तसे कळविले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी लेखी विनंती आम्ही पुन्हा करणार आहोत. या तपासावर उच्च न्यायालयाची निगराणी असल्यामुळे राज्य सरकारची कोणतीही भूमिका नाही. उच्च न्यायालयाने ज्या दिवशी तपास हाती घेतला त्या दिवसापासून सरकारची भूमिका संपली आहे. राज्य सरकारला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयापेक्षा वरचे स्थान नाही, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

ही मृत्यूची मालिका दुर्दैवी - दिग्विजयसिंग
यापूर्वीचे डीन डॉ. सकाल्ले यांच्या पाठोपाठ डॉ. शर्मा यांच्या मृत्यूची भर पडली आहे. डॉ. शर्मा यांचे वडील एन.के. शर्मा हे मंत्री होते. ते मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही राहिले होते, असा उल्लेख काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी टिष्ट्वटमध्ये केला आहे. तपास उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एसआयटीकडून केला जात असून उच्च न्यायालय अन्य कोणत्याही संस्थेमार्फत तपासाचे आदेश देत असेल तर आमचा आक्षेप नाही. काँग्रेसने मागणी केल्याप्रमाणे सीबीआय तपासालाही विरोध नाही. -शिवराज सिंह चौहान
-----------------
तपासाची ठोसपावले उचललीत
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीवर १० मिनिटे चर्चा करीत व्यापमं घोटाळ्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. टीव्ही पत्रकार अक्षयसिंग यांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी व्हावी असा आदेश त्यांनी दिला. चौहान यांनी अक्षयसिंग यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली परिस्थिती तसेच तपासाच्या अनुषंगाने कोणती पावले उचलण्यात आली याची विस्तृत माहिती दिल्याचे समजते. या प्रकरणाशी संबंधित सर्व लोकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासही राजनाथसिंह यांनी सुचविले आहे.

Web Title: 27th victim of business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.