नवी दिल्ली : मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर एनआयए कोठडीत त्याची रोज ८ ते १० तास कसून चौकशी केली जात आहे. २००८ मधील २६/११च्या या हल्ल्याचा कट नेमका कुणी, कुठे आणि कसा आखला ही माहिती मिळवण्यासाठी ही चौकशी सुरू आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चौकशी सुरू असताना राणाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. शिवाय, त्याला वकिलांची भेट घेण्याची परवानगी दिली जात आहे. दिल्लीतील न्यायालयाने राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावल्यानंतर राणाची वैद्यकीय तपासणी तसेच वकिलांची भेट घेण्यासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले.
२४ तास जवान तैनात
अत्यंत कडवा दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणा यास सीजीओ कॉम्प्लेक्समधील दहशतवादविरोधी संस्थेच्या मुख्यालयात अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या एका कोठडीत ठेवण्यात आले आहे. येथे चोवीस तास सुरक्षा जवान तैनात आहेत.
चौकशीत राणाचे सहकार्य
एनआयएच्या चौकशी पथकाचे नेतृत्व मुख्य तपास अधिकारी जया रॉय करीत असून सूत्रांनुसार राणा या चौकशीत पूर्ण सहकार्य करीत आहे.
आतापर्यंत राणाने कोठडीत पेन, कागद आणि कुराण या तीनच वस्तूंची मागणी केली असून त्या त्याला पुरवण्यात आल्या आहेत.
या पुराव्यांच्या आधारे चौकशी
६४ वर्षीय पाकिस्तानी वंशाचा कॅनडातील व्यावसायिक असलेल्या राणा याच्या विरोधात जमा असलेल्या पुराव्यांच्या आधारे ही चौकशी होत आहे.
यात राणाचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडली ऊर्फ दाऊद गिलानी याच्याशी झालेल्या फोन कॉलचा समावेश आहे. हेडली अमेरिकी नागरिक असून तो तेथील तुरुंगात आहे.
इतर कैद्यांसारखेच जेवण
राणाने भोजनात वेगळ्या पदार्थांची मागणी केलेली नाही. अशा परिस्थितीत ठरलेले नियम आणि शिष्टाचारानुसार त्याला इतर कैद्यांप्रमाणेच भोजन दिले जात आहे.
२६/११ पूर्वी तो कुठे-कुठे फिरला?
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत भीषण नरसंहारापूर्वी राणा उत्तर किंवा दक्षिण भारतातील काही भागांत फिरला होता का याची माहिती चौकशीत मिळेल, अशी आशा आहे. मुंबईतील या हल्ल्यांत १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर २३८ हून अधिक जखमी झाले होते.