तेलंगणात मागासवर्गीयांसाठी वर्षाला २० हजार कोटींचा निधी, काँग्रेसचे आश्वासन; सहा महिन्यांत जातनिहाय गणना करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 12:51 PM2023-11-11T12:51:16+5:302023-11-11T12:51:37+5:30
सत्ता मिळाल्यास सहा महिन्यांच्या आत जातनिहाय गणना करणार असल्याचे त्या पक्षाने म्हटले आहे.
हैदराबाद : तेलंगणात मागासवर्गीय घटकांच्या कल्याण योजनांकरिता दरवर्षी २० हजार कोटी रुपयांचा तर अल्पसंख्याक समाजाच्या विकास योजनांकरिता चार हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. सत्ता मिळाल्यास सहा महिन्यांच्या आत जातनिहाय गणना करणार असल्याचे त्या पक्षाने म्हटले आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आश्वासनात काँग्रेसने म्हटले आहे की, तेलंगणात सरकारी नोकऱ्या, शिक्षणक्षेत्रात मागासवर्गीयांन तसेच अल्पसंख्याकांना योग्य राखीव जागा देण्यात येतील. अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार युवक व महिलांना एक हजार कोटी रुपयांची कर्जे सवलतीच्या व्याजदरात दिली जातील. इमाम, मुएझिन, खादिम, पाद्री आणि ग्रंथी या धर्मगुरुंना महिना १० ते १२ हजार रुपयांचे मानधन देण्याचे आश्वासनही दिले आहे. (वृत्तसंस्था)
भाजपच्या यादी, १४ उमेदवारांचा समावेश
तेलंगणामध्ये भाजपने शुक्रवारी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली असून, त्यात १४ जणांचा समावेश आहे. त्यामध्ये भाजपचे माजी आमदार एन. रामचंद्र राव यांचाही समावेश असून, त्यांना मलकाजगिरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
शुक्रवारी जाहीर झालेल्या भाजपच्या अंतिम यादीत ए. श्रीदेवी (बेल्लामपल्ली राखीव मतदारसंघ), दुग्याला प्रदीप (पेड्डापल्ली), रवी कुमार यादव (सेरिलिंगमपल्ली), राहुल चंद्र (नामपल्ली), के महेंद्र आदींचा समावेश आहे.
अल्पसंख्याकांतील बेघरांना घरासाठी ५ लाखांचे साहाय्य
तेलंगणामध्ये शीख अल्पसंख्याक वित्तसाहाय्य महामंडळ स्थापन करण्याचा तसेच उर्दू माध्यमातील शाळांत शिक्षक भरती करण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. अल्पसंख्याक समाजातील बेघर लोकांना जागा देण्याचे व घर बांधण्यासाठी ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्याची तयारी काँग्रेसने दाखविली आहे. या समाजातील विवाहित जोडप्यांना १ लाख ६० हजार रुपये देण्यात येतील.