गुजरातमध्ये २+२=३ शक्य!
By Admin | Updated: June 4, 2015 23:29 IST2015-06-04T23:29:33+5:302015-06-04T23:29:33+5:30
जम्मू-काश्मिरातील एका शिक्षकाला गायीवरील निबंध लिहिता न आल्याने न्यायालयाने अनुत्तीर्ण केले होते.

गुजरातमध्ये २+२=३ शक्य!
अहमदाबाद : जम्मू-काश्मिरातील एका शिक्षकाला गायीवरील निबंध लिहिता न आल्याने न्यायालयाने अनुत्तीर्ण केले होते. आता गुजरातमधील शिक्षकांनी २+२ ची बेरीज ३ करून ढासळत्या शैक्षणिक दर्जाचा आणखी एक धक्कादायक नमुना सादर केला आहे.
दहावीच्या गणित विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनी हा प्रताप केला असून त्यांच्या या घोडचुकीमुळे ६५ हजारावर विद्यार्थ्यांवर अनुत्तीर्ण होण्याची पाळी आली होती. आॅनलाईन रिझल्टस् संगणकात फीड केले जात असताना गुणांची पुन्हा पडताळणी करण्यात आली त्यावेळी ही चूक लक्षात आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली.
गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने तातडीने ही चूक दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. संपूर्ण उत्तर पत्रिकांची फेरतपासणी करण्यात आली आणि नंतर नव्याने गुणपत्रिका तयार करण्यात आल्या.
आश्चर्याची बाब म्हणजे शिक्षकांनी या उत्तरपत्रिका तपासल्यानंतर वरिष्ठ शिक्षक आणि परीक्षा नियंत्रण अशा आखणी दोघांनीही या उत्तरपत्रिका तपासल्या. परंतु ही चूक कुणाच्याही लक्षात आली नाही. २+२ चे उत्तर ४ ऐवजी ३ मानून या शिक्षकांनी बरोबर उत्तरावरही फुली मारली.
दरम्यान शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेसाठी नियुक्त केलेले विशेष अधिकारी एम.एम. पठाण यांनी सांगितले की, हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न होता. त्यांचे कुठलेही नुकसान होऊ नये हणून संपूर्ण प्रक्रिया नव्याने पूर्ण करण्यात आली. (वृत्तसंस्था)
४राज्यातील बारावीच्या परीक्षेचे सचिव जी.डी. पटेल यांनी सुद्धा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या एवढ्या वरिष्ठ शिक्षकांकडून अशी चूक कशी होऊ शकते याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.