१९७१ मध्ये पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतरचा ऐतिहासिक क्षण असलेला फोटो सोमवारी (१६ डिसेंबर) लष्करप्रमुखांच्या लाऊन्जमधून हटवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. फोटो प्रतिक्षा कक्षातून काढून आता दिल्ली छावणीतील मानेकशॉ सेंटरमध्ये लावण्यात आली आहे. वाद निर्माण झाल्यानंतर लष्कराकडून याबद्दल भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
विजय दिवस निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि त्यांच्या पत्नी सुनीता द्विवेदी यांच्या हस्ते ही पेंटिंग मानेकशॉ सेंटरमध्ये लावण्यात आली. १९७१च्या युद्धाचे नायक फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या स्मरणात उभारण्यात आलेले आहे.
लष्करप्रमुखांच्या कार्यालयातून १९७१ च्या युद्धातील ही पेंटिंग हटवण्यात आल्याने माजी लष्कर अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. लष्करप्रमुखांच्या प्रतिक्षा कक्षात ज्या ठिकाणी हे पेंटिंग होते, तिथे आता पेगाँग त्सो झीलच्या जवळच्या लष्करी ठिकाणाचा, कृष्णाचा आणि नवीन हेलिकॉप्टरचा फोटो लावण्यात आला आहे.
लष्कराने काय म्हटलं आहे?
१९७१च्या वार पेंटिंगबद्दल लष्कराने म्हटले आहे की, विजय दिवस निमित्ताने लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, सुनीता द्विवेदी यांच्या हस्ते शरणागतीचे पेंटिंग त्याला साजेशा ठिकाणी म्हणजे १९७१च्या युद्धाचे नायक मानेकशॉ सेंटरमध्ये लावण्यात आले आहे. ही पेंटिंग भारतीय लष्कराच्या सर्वात मोठ्या लष्करी विजयापैकी एक आहे आणि सर्वांसाठी न्याय आणि माणुसकीसाठी भारताच्या कटिबद्ध भूमिकेचे प्रमाण आहे. नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटरमध्ये हे पेंटिंग लावल्याने सर्वांना बघायला मिळणार आहे. या ठिकाणी भारत आणि जगभरातून लोक मोठ्या संख्येने येतात, अशी भूमिका लष्कराने मांडली आहे.