१७७ काश्मिरी पंडितांच्या जिल्हा मुख्यालयात बदल्या; ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांनंतर सरकारचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 06:15 AM2022-06-05T06:15:21+5:302022-06-05T06:55:01+5:30

Target Killing : सातत्याने होणाऱ्या या ‘टार्गेट किलिंग’मुळे पंडितांत तीव्र असंतोष आहे. तो कमी करण्यासाठी बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे.

177 Kashmiri Pandits transferred to district headquarters; Government action in the wake of 'Target Killing' incidents | १७७ काश्मिरी पंडितांच्या जिल्हा मुख्यालयात बदल्या; ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांनंतर सरकारचे पाऊल

१७७ काश्मिरी पंडितांच्या जिल्हा मुख्यालयात बदल्या; ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांनंतर सरकारचे पाऊल

Next

श्रीनगर : काश्मिरात अतिरेकी वेचून-वेचून काश्मिरी पंडितांच्या हत्या करीत असल्यामुळे १७७ शिक्षक पंडितांच्या जिल्हा मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयात शुक्रवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 
श्रीनगरच्या मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांनी एक पत्र जारी करून शिक्षकांच्या बदलीची माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांना वेचून-वेचून ठार मारले जात आहे. सातत्याने होणाऱ्या या ‘टार्गेट किलिंग’मुळे पंडितांत तीव्र असंतोष आहे. तो कमी करण्यासाठी बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे.

३१ मार्च रोजी सांबा येथील शिक्षिका रजनी बाला यांची अतिरेक्यांनी त्यांच्या शाळेबाहेर गोळ्या घालून हत्या केली होती. तेव्हापासून काश्मिरी पंडित बदलीची मागणी करीत आहेत. अनंतनागमधील मट्टन येथील रहिवासी असलेले काश्मिरी पंडित रंजन ज्योतिषी यांनी सांगितले की, आमच्या संयमाचा बांध आता तुटला आहे. 

आमचे कित्येक लोक मारले गेले आहेत. सरकारला आमच्याकडून काय हवे आहे? येथे सुरक्षा दलांचे लोकच सुरक्षित नाहीत, तर आम्ही कसे सुरक्षित राहणार? आपल्याला काश्मीरमधून बाहेर काढून जम्मूत हलविण्यात यावे, अशी मागणी पंडितांकडून केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात ५९०० हिंदू कर्मचारी आहेत. त्यातील १,१०० जण संक्रमण शिबिरांत राहतात. ४,७०० लोक खासगी निवासस्थानी राहतात. यातील ८० टक्के कर्मचारी आधीच काश्मीर सोडून जम्मूत आश्रयास आले आहेत. अनंतनाग, बारामुल्ला आणि श्रीनगर येथील संक्रमण शिबिरातील कित्येक परिवार पोलीस-प्रशासनाच्या पहाऱ्यामुळे तेथे अडकून पडले आहेत.

यादी व्हायरल झाल्यामुळे चिंता वाढली
बदल्या करण्यात आलेल्या शिक्षक पंडितांची यादी समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून, त्यावर काश्मीर भाजपने आक्षेप घेतला आहे. बदल्यांची यादी व्हायरल झाल्यामुळे कोणाला कोठे पोस्टिंग मिळाली, याची माहिती अतिरेक्यांना सहजपणे मिळेल. यादी व्हायरल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे भाजप प्रवक्ता अल्ताफ ठाकूर यांनी म्हटले आहे.

चकमकीत हिजबुलचा कमांडर ठार
जम्मू-काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या भीषण चकमकीत शनिवारी हिजबुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर ठार झाला, तर तीन लष्करी जवान आणि एक नागरिक असे चार जण जखमी झाले. निसार खांडे असे मृत अतिरेक्याचे नाव आहे. त्याच्याकडून १ एके ४७ रायफल आणि स्फोटके यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील रिशीपोरा भागात शुक्रवारी सायंकाळी चकमकीला तोंड फुटले. जखमींना श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: 177 Kashmiri Pandits transferred to district headquarters; Government action in the wake of 'Target Killing' incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.