१६ वर्षाचा आरोपीही जाणार तुरुंगात!
By Admin | Updated: April 22, 2015 22:01 IST2015-04-22T21:55:59+5:302015-04-22T22:01:07+5:30
बालसुधारगृहामध्ये रवानगी होत असलेल्या १६ वर्षाच्या आरोपींना आता तुरुंगाची हवा खाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

१६ वर्षाचा आरोपीही जाणार तुरुंगात!
बालहक्क कायद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - एखाद्या गुन्हयात अडकल्यानंतर १८ वर्ष पूर्ण केले नसल्याने आरोपी सज्ञान नसल्याचे कारण देत बालसुधारगृहामध्ये रवानगी होत असलेल्या १६ वर्षाच्या आरोपींना आता तुरुंगाची हवा खाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १६ ते १८ वय असलेल्या व गुन्हयात अडकलेल्या आरोपीविरुध्द भादंवी कायद्यांतर्गत खटला चालु देण्याच्या बालहक्क कायद्याच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
अल्पवयीन न्या : सुरक्षा आणि संरक्षण अधिनियम अंतर्गत या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली अशी माहिती केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी प्रसारमाध्यामांना दिली. संसदीय समितीच्या शिफारसी मंजुर करतानाच हा मंजुर करण्यात आलेला प्रस्ताव पुढे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन कायद्यामुळे १६ ते १८ वर्षीय युवकांना आता बालसुधारगृहात पाठविण्याऐवजी त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान अंतर्गत न्यायालयीन खटला लढून त्यांना प्रौढ व्यक्तीप्रमोण शिक्षेस सामोरे जावे लागेल. दरम्यान, हत्या, बलात्कार आणि दरोडा यासारख्या गुन्हयांमध्ये अडकलेल्या अल्पवयीन आरोपीविरुध्द असलेल्या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. तसेच दिल्लीत निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात एका अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याने हा चर्चेचा विषय बनला होता.