राजस्थानच्या १६ मंत्र्यांना धमकीचे ई-मेल
By Admin | Updated: December 27, 2014 05:00 IST2014-12-27T05:00:15+5:302014-12-27T05:00:15+5:30
राजस्थान मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांना त्यांच्या सरकारी ई-मेल आयडीवर इंडियन मुजाहिदीनच्या नावाने कथित रूपाने धमकीचे ई-मेल्स आल्याची माहिती राजस्थान पोलिसांनी दिली

राजस्थानच्या १६ मंत्र्यांना धमकीचे ई-मेल
जयपूर : राजस्थान मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांना त्यांच्या सरकारी ई-मेल आयडीवर इंडियन मुजाहिदीनच्या नावाने कथित रूपाने धमकीचे ई-मेल्स आल्याची माहिती राजस्थान पोलिसांनी दिली आहे. या प्रकारामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
गृहमंत्री गुलाबचंद कटारिया व सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री अरुण चतुर्वेदी यांच्यासह अन्य कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना व राज्यमंत्र्यांना २२ डिसेंबर रोजी हे ई-मेल्स आले आहेत.
अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक त्रिपाठी यांनी, राजस्थानातील १६ मंत्र्यांना असे धमकीवजा ई-मेल्स आल्यानंतर राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचे सांगितले.
राजस्थानचे पोलीस महासंचालक ओमेंद्र भारद्वाज यांनी, या मेल्समध्ये, ‘तुम्हीच समजून जा, आम्ही काय
करू शकतो ते,’ अशा आशयाची धमकी आहे असे सांगितले. याबाबत तातडीने काही सांगणे हे चुकीचे ठरणारे असून
या ई-मेल्सचा तपास पोलीस करीत
आहेत. त्या तपासानंतरच त्याबाबत काही सांगितले जाऊ शकते, असे त्यांनी पुढे म्हटले. या प्रकारामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. (वृत्तसंस्था)
एकाच ठिकाणाहून
हे सर्व ई-मेल्स एकाच ई-मेल आयडीवरून या मंत्र्यांना पाठविले असून त्यातील भाषा बरीच अशुद्ध आहे व त्यात कोणालाही लक्ष्य बनविलेले दिसले नाही, अशीही माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक त्रिपाठी यांनी दिली.
पोलीस महासंचालक सर्व माहिती घेत आहेत व हे ई-मेल पाठविणाऱ्यांचा लवकरच छडा लावला जाईल. राज्यात सुरक्षा व्यवस्थेचा पुरेपूर बंदोबस्त केला जात आहे.
- गुलाबचंद कटारिया, गृहमंत्री, राजस्थान
या ई-मेलमध्ये संभाव्य हल्ल्याचे लक्ष्य किंवा स्वरूप याविषयी काहीही उल्लेख नाही. ज्या ई-मेल आयडीवरून हे मेल आले आहेत त्याआधारे आम्ही माहिती गोळा करीत आहोत.
- ओमेंद्र भारद्वाज,
पोलीस महासंचालक, राजस्थान