(Image Credit : yourdrugtesting.com)
नवी दिल्ली : बदललेली लाइफस्टाईल, वाढलेल्या पार्ट्या अन् वाढलेली दारूची दुकाने पाहून ढोबळ मानाने दारू पिणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असं बघायला मिळतं. पण देशातील नेमके किती लोक दारू पितात हे फारसं कुणाला माहीत नसावं. मात्र आता देशातील किती लोक दारू पितात याची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे.
सरकारने गुरूवारी याबाबतची माहिती राज्यसभेत दिली. या आकडेवारीनुसार, देशातील तब्बल १६ कोटी लोक दारू पितात, तर यातील साधारण ६ कोटी लोकांना याची सवय आहे. इतकेच नाही तर साधारण ३.१ कोटी लोक भांग असलेल्या उत्पादनांचं सेवन करतात.
काय म्हणाले मंत्री?
सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी राज्यसभेत देशातील वेगवेगळ्या भागातील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या नशेच्या सवयीची माहिती देताना वरील आकडेवारी दिली. त्यांनी सांगितले की, मंत्रालयाने २०१८ मध्ये देशात अशाप्रकारचा केलेला हा पहिलाच सर्व्हे आहे. या सर्व्हेची जबाबदारी नॅशनल ड्रग डिपेंडेंस सेंटर, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स) यांना देण्यात आली होती.
त्यांनी सांगितले की, देशातील सर्वच ३६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये २ लाख १११ परिवारांना भेटून नशेच्या पदार्थांच्या वापराची सीमा आणि पद्धतीबाबत चार लाख ७३ हजार ५६९ लोकांना प्रश्न विचारण्यातआलेत. या सर्व्हेमधून ही बाब समोर आली की, १६ कोटी लोक अल्कोहोलचं सेवन करतात. ३.१ कोटी लोक भांगपासून तयार उत्पादनांचं सेवन करतात. सोबतच २.२६ कोटी लोक अफूचं सेवन करतात.
वेगवेगळ्या प्रकारची नशा करतात लोक
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, यावेळी १० ते ७५ वयोगटातील जवळपास १.१८ कोटी लोक सीडेटिव्स(चिकित्सा नसलेले सल्ले)चा वापर करतात. तर ७७ लाख लोक इनहेलेंट्सचा वापर करतात. त्यांनी सांगितले की, नशेच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये इनहेलेंट्सच अशी श्रेणी आहे, जी लहान मुलांमध्ये आणि किशोरांमध्ये यावेळी जास्त लोकप्रिय आहे. आणि यांचा वापर ते अधिक करतात.
१० शहरात शाळा-कॉलेजमधील मुलांवर होत आहे सर्व्हे
गहलोत यांनी सांगितले की, 'मला हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे की, देशातील १० मोठी शहरं जसे की, श्रीनगर, लखनौ, रांची, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, इंफाल, डिब्रूगढ आणि दिल्लीमध्ये शाळा-कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नशेच्या पदार्थांच्या वापराबाबत सर्व्हेक्षण केलं जात आहे. हा रिपोर्ट नोव्हेंबर २०१९ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे'.