- संजय शर्मा
नवी दिल्ली : देशातील ५४३ लोकसभेच्या जागांसाठी भारतीय जनता पक्षाने १५५ क्लस्टर (गटनिहाय) प्रभारी नियुक्त केले आहेत आणि त्यांना प्रत्येकी चार जागा जिंकण्याची जबाबदारी दिली आहे.
महाराष्ट्रात १२ गटनिहाय प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते लोकसभेच्या सर्व ४८ जागांची जबाबदारी सांभाळतील. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तीन ते चार लोकसभा जागांसाठी एका प्रभारींची नियुक्ती केली आहे. देशभरात अशा १५५ गटनिहाय प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व गटनिहाय प्रभारींची पहिली बैठक मंगळवारी भाजप मुख्यालयात बोलावण्यात आली होती.
बैठकीत त्यांच्याकडे तीन ते चार लोकसभा जागांवर निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये बूथ व्यवस्थापन पाहणे, सोशल इंजिनीअरिंग, युती करणे, नेत्यांना सहभागी करून घेणे ते मतदान करण्यापर्यंतची जबाबदारी या प्रभारींवर असणार आहे.
कोणत्या राज्यात किती क्लस्टर प्रभारी? भाजपने ‘अब की बार, ४०० पार’चा नारा दिला आहे. त्यामुळे भाजप यावेळी ४५० हून अधिक जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील ८० जागांसाठी २० क्लस्टर प्रभारी, महाराष्ट्राच्या ४८ जागांसाठी १२ प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशच्या २९ जागांसाठी ७, राजस्थानच्या २५ जागांसाठी ८, दिल्लीतील सात जागांसाठी २ क्लस्टर प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. या क्लस्टर प्रभारींना त्यांच्या क्षेत्रातील तीन ते चार जागांवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.