सिगारेट आणण्यास नकार दिल्याने १४ वर्षाच्या मुलाची हत्या
By Admin | Updated: September 12, 2014 09:54 IST2014-09-12T09:52:08+5:302014-09-12T09:54:07+5:30
सिगारेट आणून देण्यास नकार दिल्याने दिल्लीतील माथेफिरु तरुणांनी नववीत शिकणा-या विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सिगारेट आणण्यास नकार दिल्याने १४ वर्षाच्या मुलाची हत्या
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - सिगारेट आणून देण्यास नकार दिल्याने दिल्लीतील माथेफिरु तरुणांनी नववीत शिकणा-या विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याघटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले असून स्थानिकांमध्ये या घटनेमुळे असंतोष निर्माण झाला आहे.
उत्तर पश्चिम दिल्लीतील वाझीपूर कॉलनीत राहणारा रंजन हा १४ वर्षीय विद्यार्थी त्याच्या मित्रासोबत क्लासवरुन परतत होता. रात्री आठच्या सुमारास कॉलनीतील बगीच्याजवळ चार ते पाच तरुण मद्यपान करत होते. या तरुणांनी रंजन व त्याच्या मित्राला थांबवले व पानटपरीतून सिगारेटचा बॉक्स आणून द्यायला सांगितले. मात्र अल्पवयीन असल्याने आम्हाला सिगारेट बॉक्स कुणीही देणार नाही असे कारण पुढे करत रंजनने सिगारेट आणून देण्यास नकार दिला. रंजनच्या नकारामुळे संतापलेल्या तरुणांनी रंजनला बेदम मारहाण केली तसेच यातील एका तरुणाने चाकूने रंजनवर वार केले. या गुंडांच्या तावडीतून पळालेल्या रंजनच्या मित्राने घटनेची माहिती कॉलनीतील रहिवाशांना दिला व यानंतर हा प्रकार उघड झाला. मात्र रंजनचे कुटुंब आणि स्थानिक रहिवासी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रंजनचा घटनास्थळीच मृत्यू झाला.